
गोंदिया, दि.1 : कचारगड लाखो आदिवासी भाविकांचे श्रध्दास्थान आहे. अनेक राज्यांमधून दरवर्षी भाविक येथे मोठ्या श्रद्धेने येत असतात. येथे येणाऱ्या भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्यामुळे कचारगडच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी केले.
राष्ट्रीय स्तरावरचा गोंडी समाजाचा सांस्कृतिक उत्सव, महाअधिवेशन तथा कोया पुनेम महापुजा निमित्त सालेकसा तालुक्यातील धनेगाव येथे 30 जानेवारीपासून ‘पारी कोपार लिंगो’ माँ कली कंकाली पेनठाना देवस्थान कचारगड यात्रा सुरु झाली असून येथील सांस्कृतिक भवन येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात श्री. उईके बोलत होते.
राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, खासदार डॉ.प्रशांत पडोळे, सर्वश्री आमदार संजय पुराम, डॉ.परिणय फुके, माजी आमदार (गडचिरोली) देवराव होळी, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, धनेगाव ग्रामपंचायत सरपंच सिंधू घरत, जिल्हा परिषद सदस्य सविता पुराम, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यावेळी उपस्थित होते.
श्री. उईके म्हणाले, कचारगड ही आदिवासी समाजाची पवित्र भूमी आहे. या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या भक्ती भावाने येतात. आदिवासी ही आपली गौरवशाली संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. या ठिकाणी मिळालेल्या आशिर्वादरुपी ऊर्जा, आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रेरणा देणारी असते.
जल, जमीन व जंगलाचे संवर्धन आदिवासी समाजाने केले आहे. या समाजाच्या प्राचीन अशा संस्कृतीचे जतन करण्याचा शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येत आहे. आदिवासी समाजातील सांस्कृतिक वारसा, भाषा, कला आणि परंपरेचे संवर्धन करण्यावर भर देणार आहे. आदिवासींच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असून कचारगडच्या विकासासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करेन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री. भोयर म्हणाले, कचारगड हे आदिवासी बांधवांचे पवित्र श्रध्दास्थान आहे. या भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन कचारगडच्या विकासासाठी ज्या असुविधा भासत आहेत, त्या सर्व सुविधा आपण शासन स्तरावर पुढाकार घेऊन सोडवू असे त्यांनी यावेळी सांगितले.
कचारगड ही यात्रा आत्मिक शांतीकडे घेऊन जाते. आपण आपली संस्कृती विसरु नये. गोंडी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र शासन स्तरावर आपण नक्कीच प्रयत्न करु असे खासदार डॉ.प्रशांत पडोळे म्हणाले.
कचारगड हे आदिवासी समाजाचे श्रध्दास्थळ असून गोंडी समाजाचे केंद्रबिंदू आहे. कचारगडच्या विकासासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर करण्यात यावा, गोंडी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा, या ठिकाणी भाविकांच्या सोईच्या दृष्टीने कायमस्वरुपी भव्य दिव्य असे व्यासपीठाचे निर्माण करण्यात यावे, अशा मागण्या आमदार संजय पुराम यांनी आपल्या भाषणात व्यक्त केल्या.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन भरत मडावी यांनी केले. कार्यक्रमास आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.





