33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ मातोश्री व बळीराजा पांदण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठक

मातोश्री व बळीराजा पांदण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठक

0
52

blank

अर्जुनी-मोरगाव– मातोश्री पांदण योजना, मुख्यमंत्री बळीराजा पांदण योजना तसेच अभिसरण कामांच्या अंमलबजावणीसंदर्भात तहसील कार्यालय अर्जुनी-मोरगाव येथील सभागृहात ता.९ महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना यांच्या अंमलबजावणीवर सखोल चर्चा करण्यात आली.
या वेळी आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही मजबूत व पक्के रस्ते उपलब्ध होतील. त्यामुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होऊन यंत्रसामग्रीचा वापर वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होईल.
आमदार बडोले पुढे म्हणाले की, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रलंबित असलेल्या शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांना या योजनांमुळे गती मिळणार आहे. प्रशासनाने कामांच्या दर्जाकडे विशेष लक्ष देऊन वेळेत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत अभिसरण कामांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. मनरेगा आणि इतर योजनांचा समन्वय साधून निधीचा योग्य वापर करून रस्ते, शेततळी, पाझर तलाव आदी कामे प्रभावीपणे राबवावीत, असे निर्देश देण्यात आले. मनरेगातून अकुशल मजुरी आणि इतर योजनांतून कुशल कामाचा भाग घेऊन अधिकाधिक विकासकामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, सडक अर्जुनी पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, अर्जुनी मोर पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, उपसभापती संदीप कापगते, गोरेगाव उपसभापती रामेश्वर महारवाडे, जि.प. सदस्य यशवंत गणविर, रचनाताई गहाणे, माजी सभापती प्रकाश गहाणे, कृ.उ.बा.स. सभापती डॉ. अविनाश काशीवार, पं.स. सदस्य डॉ. नाजुक कुंभरे, होमराज पुस्तोडे, नुतनजी सोनवाणे, प्रमोद लांडगे, माजी उपसभापती राजेश कठाणे, लोकपाल गहाणे, उपविभागीय अधिकारी ज्योतीताई कांबळे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, गटविकास अधिकारी पल्लवीताई वाडेकर, तालुका कृषी अधिकारी सुलोचना पाथोडे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीमुळे तालुक्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

blank