*जिल्हा माहिती कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम*
गोंदिया, दि.24 : योजनांच्या मल्टीमीडिया प्रदर्शनीतून जिल्ह्यातील नागरिक माहिती घेत असल्याची प्रतिक्रिया योजनांच्या प्रदर्शनीला भेट देताना जिल्हाधिकारी प्रजित नायर म्हणाले. जिल्हा माहिती कार्यालयाने यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून मल्टीमीडिया प्रदर्शन आयोजन करून एक चांगला पायंडा पाडला आहे. माहिती कार्यालयाचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
येथील नवीन प्रशासकीय इमारतीत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने प्रदर्शन आयोजित केले आहे. नवीन प्रशासकीय इमारतीत एकाच ठिकाणी शासनाच्या विविध विभागातील एकूण 40 योजनांची चित्रमय माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये योजनेचे स्वरुप, लाभाचे स्वरुप, लाभार्थी पात्रता, अर्ज कुठे करावा, संपर्क कुठे साधावा, अशी प्रत्येक पॅनलवर योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर योजनांच्या मल्टीमीडिया प्रदर्शनीला जिल्ह्यातील नागरिकांनी भेट देऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी व संबंधित विभागाकडे अर्ज सादर करुन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी यावेळी केले.
गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना मल्टीमीडियाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने 24 ते 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





