– अनेक विभागातील कर्मचारी जबाबदारीविना तर जिल्हा परिषदेची आस्थापना नसलेल्या मूख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अंगरक्षकावर जबाबदारी
– काही मोजक्याच कर्मचाऱ्यावर सोपविला आयोजनाचा भार – जिल्हा निधीतून १० लाखाचा निधी तरीही कर्मचारीवर्गाकडून टीशर्टच्यानावावर १ हजाराची वसुली
गोंदिया – तीन वर्षानंतर होत असलेले जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव ‘नवा गडी नवा राज ‘ प्रमाणे होत असला तरी आयोजन हे केवळ दिखावा ठरणार? असेच जाणवत आहे.त्यातच या कार्यक्रमाची माहिती प्रसारमाध्यमानाही देणे उमेदच्या पलाश कार्यक्रमासारखे योग्य वाटले नाही.
त्यातच जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण निधीतील रक्कम वापरली जात असली तरी मागच्या कार्यक्रमानंतर राहिलेल्या शिल्लक निधीबाबत शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत आहे.विशेष म्हणजे या महोत्सवाकरीता जिल्हा निधीतून १० लाख रुपयाचा निधी मंजुर करण्यात आल्याचे वृत्त आहे.१० लाख रुपयाचा निधी असतानाही आमगाव,देवरी,सालेकसा,अर्जुनी मोरगावसह सर्वच पंचायत समितीमधील कर्मचारीवर्गाला १ हजार रुपये टी शर्टकरीता मागण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.सदर टिशर्टची किमंत १ हजार असल्याचे सांगत सांख्यिकी विस्तार अधिकारी यांच्याकडे पैसे जमा करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.
जिल्हे परिषदेतील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी तीन वर्षाआधी आयोजित कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले होते. मात्र त्याच धर्तीवर होत असलेले यावर्षीचे आयोजन काहीसे नीरस असल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित या आयोजनाची जबाबदारी ही जिल्हा परिषद मुख्यालयाकडे असल्याने या इमारतीतील सर्वच विभागातील किमान एका तरी कर्मचाऱ्यावर कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी देणे अपेक्षित होतं. मात्र मुख्यालयातील मागील अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना डावलत जिल्हा परिषदेत आस्थापना नसलेल्या कर्मचाऱ्यावर विशेष जबाबदारी देण्यात आल्याचे दिसत आहे. यात गोरेगांव व गोंदिया पंचायत समितीत बदली झालेल्या महिला कर्मचारी, जिल्हा परिषदेची आस्थापना नसलेले मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे एका अंगरक्षक यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आल्याचे पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे एकाच कर्मचाऱ्यावर दोन ते तीन समितीची जबाबदारी देण्यात आली आहे मात्र अनेक विभागातील कर्मचारी मात्र जबाबदारी विना असल्याने कर्मचाऱ्यात हवा तसा उत्साह दिसत नाही. आयोजनासाठी तयार करण्यात आलेल्या समितीची जबाबदारी ही विभागप्रमुख यांच्याकडे देण्यात आली आहे, हे चांगले असले तरी प्रत्येक विभागातून किमान एकतरी कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी देणे अपेक्षित होते. मात्र तसेच झालेले नाही. कार्यक्रमाचे उद्घाटन 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजता होत असले सर्व तरि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना वरिष्ठांकडून नसल्याचे कर्मचारी सांगत असल्याने नवल व्यक्त केले जात असून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.





