26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home शैक्षणिक शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाबाबत आमदारांसमवेत बैठक घेणार -राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाबाबत आमदारांसमवेत बैठक घेणार -राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

0
44

मुंबई, दि. 24 : शिक्षकांवर वाढत चाललेल्या अशैक्षणिक कामांच्या पार्श्वभूमीवर अध्यापनावर परिणाम होऊ नये यासाठी सर्व शिक्षक आमदारांसोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रवीण दरेकर, अभिजीत वंजारी, ज्ञानेश्वर म्हात्रे, किरण सरनाईक यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी 23 ऑगस्ट 2024 शासन निर्णयानुसार शैक्षणिक, अशैक्षणिक आणि आरटीई अंतर्गत अनिवार्य कामांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारणाची कामे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधिमंडळ व संसद निवडणुका हीच अनिवार्य कामे शिक्षकांकडून घेतली जाणार आहेत. इतर अशैक्षणिक कामे शिक्षकांना सोपवू नयेत, याबाबत संबंधित विभागांना त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच शिक्षकांचे काम सुलभ व्हावे आणि प्रत्यक्ष अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध व्हावा यासाठी ‘सरल’ व ‘युडायस’ (यूडीआयएसई) प्रणालींचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. शाळा स्तरावरील विविध समित्यांचे विलिनीकरण करून समित्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन दक्षता घेत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

blank