
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा विकास आणि सामाजिक कल्याण यांचा समतोल साधणारा आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी विविध योजना, शेतीसाठी वीज अनुदान आणि कृषी क्षेत्राच्या बळकटीसाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्यासारख्या कृषिप्रधान भागासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. २ लक्ष रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि प्रोत्साहन राशी शेतकऱ्यांना दिलासा देणारी बाब आहे.
महिलांच्या सक्षमीकरणाला सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणाऱ्या योजना आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी केलेल्या तरतुदीमुळे महिलांचे सशक्तीकरण अधिक वेगाने होईल.
शिक्षण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा वाढाव्यात आणि नव्या पिढीला उज्ज्वल भवितव्याची संधी मिळावी यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
आरोग्य क्षेत्रासाठीही मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा मिळाव्यात, ग्रामीण रुग्णालये सक्षम व्हावीत आणि आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत व्हावी यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण ठरेल.





