
-सहावे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन
-राष्ट्रसंतांनी जनतेमध्ये शोधला जनार्धन – डॉ. अक्षयकुमार काळे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार ज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री नितीन गडकरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अद्यासन व विचारधारा विभागाच्या वतीने सहावे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ. ऐ.के. डोरले सभागृहात शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी पार पडले. संमेलनाचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते.
साहित्य संमेलन उद्घाटन समारंभ व ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला उद्घाटक म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी, उद्घाटन समारंभ अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, संमेलनाध्यक्ष म्हणून ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र मोझरी येथील सरचिटणीस पद्मश्री श्री. जनार्दनपंत बोथे, माजी कुलगुरू डॉ.श.नु. पठाण, अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांची उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी साहित्य, भजन, काव्य लिहिण्यासोबत प्रत्यक्ष कृतीतून समाज परिवर्तन केले, असे श्री. गडकरी पुढे बोलताना म्हणाले. राष्ट्रसंतांचे जीवनकार्य, कर्तुत्व आज देखील प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारातून झालेले समाज परिवर्तन आज समाजात बघावयास मिळते. साहित्य, काव्य, संगीत, नृत्य, नाटक, प्रबोधन आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून मानवी मनावर काय परिणाम होतो, याचे अध्ययन करण्याची गरज केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे व्यक्तिमत्व वेगळे असून त्यांच्या लिखाणातील भावार्थ वेगळा होता. सत्य, अहिंसा या सोबतच त्यांनी सामर्थ्याची देखील पूजा केली. स्पृश्य-अस्पृश्य, भेदाभेद नष्ट करण्यासोबतच गावागावातील तंटे-वाद मिटवत राष्ट्राच्या अर्थात भारताच्या विकासचा कानमंत्र राष्ट्रसंतांनी जनतेला दिला. संगीतातील खंजिरी हा प्रकार महाराजांनी महाराष्ट्रच नव्हे तर देशाला माहिती करून दिला. त्यांच्या विचारात वक्तृत्वात विशिष्ट प्रकारची लय होती. त्यामुळेच राष्ट्रसंत समाजमान्य झाल्याचे श्री गडकरी म्हणाले. महाराजांना ग्रामीण जनतेची नाडी समजली होती. सर्व सामान्य जनतेला कळेल, अशी साहित्य रचना त्यांनी केली. ‘मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव’ अशा किती सोप्या शब्दात महाराजांनी तत्त्वज्ञान सांगितले. आजची तरुण पिढी जर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन कृतीशील नसेल तर त्यांचे विचार कमी होईल. आज विज्ञानाची भाषा तरुण पिढीला समजत असून या दृष्टीने विद्यापीठाने विचार करीत डिजिटल माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार तरुण पिढी तसेच समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. या सोबतच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराप्रमाणे आधुनिक क्रांती कशाप्रकारे घडविता येईल, याची माहिती त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून दिली.
*जनतेमध्ये शोधला जनार्दन – डॉ. अक्षय कुमार काळे*
राष्ट्रसंतांनी जनतेमध्ये जनार्दन शोधला असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी केले. आधुनिक काळात म्हणजे विसाव्या शतकात भारतीय संतांची पूर्वपरंपरा संपूर्णपणे आपल्या व्यक्तिमत्त्वात जिरवून संपूर्ण भारतवर्षाला आपल्या सातत्यपूर्ण प्रबोधनाने ज्यांनी नवा मार्ग दाखविला अशा बोटांवर मोजता येण्यासारख्या संत मंडळीत राष्ट्रसंत हे अग्रणी संत होते. संत ज्ञानेश्वर, संत चोखोबा, संत नामदेव, संत एकनाथ, संत रामदास, संत तुकोबा, सावता माळी, शेख महंमद, जनाबाई, नरहरी सोनार इत्यादी सर्वच संत मंडळी ईश्वरोपासना करीत असली आणि आपल्या उपास्य दैवताच्या भक्तीत तल्लीन झालेली असली तरी समाजविन्मुख कधीच नव्हती. सभोवतालच्या ज्या विशाल जनसागरात हे संत जगत होते. त्याच्या रक्षणाची उन्नतीची ध्येयपूर्ण विकासाची जबाबदारी आपल्याच शिरावर आहे, ह्याची विवेकी जाणीव त्यांना होती. ही जबाबदारी पेलताना त्यांनी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचा आदर्श प्रस्तुत केला, असे डॉ. काळे म्हणाले. साहित्य निर्मितीमध्ये अनन्यपणे कार्यरत होणारा महत्त्वाचा घटक म्हणजे साहित्यनिर्मात्याचे व्यक्तिमत्व. त्यामुळे महाराजांच्या साहित्याचा अभ्यास करताना त्यांच्या बहुपरिणामयुक्त व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे अपरिहार्यच ठरते. महाराज मूलतः भक्त आणि साधक आहेत. चराचराला नियंत्रित करणाऱ्या त्या दिव्यशक्तीचा शोध ही त्यांची बालपणापासूनची असोशी होती. त्याकरिता करावी लागणारी कठोर उपासना महाराजांनी आपल्या पूर्वायुष्यात केली. ईश्वर शक्तीचे प्राप्त होणारे रहस्यदर्शन प्रत्येक व्यक्तीचे सापेक्ष दर्शन असते. शेवटी ती एक हृदयतळापर्यंत जाणारी जाणीव, एक संवेदना, एक साक्षात्कार आहे. तो साक्षात्कार महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा सूत्रबिंदू आहे. या जाणिवेच्या परिवर्तनशील विस्तार त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वामध्ये विविध रूपांनी प्रकट झाला आहे. विशाल मानवता, सर्वस्पर्शी राष्ट्रभावना आणि समाजहितैशी दृष्टी ही महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. विश्वकरुणा आणि मानवता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जगाच्या विशालतेत विलीन होण्यासाठी व्यक्तिमत्व विश्वकरुणेने व्यापून घ्यावे लागते. महाराजांचे हृदय केवळ तिने व्यापलेच नाही, तर ते हृदय ओसंडून ती वाहत राहिली. त्यांचे विश्वचिंतन या करुनेतून निर्माण झाले. दारिद्र्य आणि अज्ञान यांच्या कर्दमात रुतत चाललेल्या सभोवतालच्या अज्ञ बहुजन समाजापासून अत्यंत प्रगत, पण कधीकधी युद्धखोर बनणाऱ्या विश्व समाजापर्यंत विचार करणारी त्यांच्या जाणिवेची कक्षा अतिशय व्यापक होती, असे डॉ. काळे म्हणाले. राष्ट्रसंतांचा राष्ट्रवाद केवळ भारताला पारतंत्र्याच्या अंधकारमय दास्यातून स्वातंत्र्याच्या लब्ध प्रकाशात आणण्याशी संबंधित नाही तर स्वातंत्र्यानंतरच्या बलशाली भारत निर्माण करण्याशीही संबंधित आहे, जो स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांच्या पायावर उभा आहे. कोणत्याही विकृत मूलतत्त्ववादी वृत्तीपासून, धार्मिक उन्मादापासून सर्वथा मुक्त आहे. महाराजांची राष्ट्रवादासंबंधीची कल्पना सर्वंकष स्वातंत्र्य आणि पुरोगामीत्वाला बळ देणारी तर्कपद्धती यातून विकसित झाली आहे. यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवरराष्ट्रनिर्मितीचे स्वप्न ते पाहू शकले. नवराष्ट्राच्या निर्मितीचा नकाशा तयार करू शकले आणि त्याबरहुकूम कृतीशीलतेच्या मार्गावर गंभीरपणे आणि खंभीरपणे आपली पावले टाकू शकले. त्यांच्या साहित्याची विस्तृत माहिती देताना राष्ट्रसंतांना भारतरत्न देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. भारतरत्न मिळाल्यास संपूर्ण भारतात महाराजांविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न नागरिक करतील, यातून महाराजांचे विचार संपूर्ण देशच नव्हे तर विश्वात पोहोचेल असे देखील डॉ. काळे म्हणाले.
*राष्ट्रनिर्माणाचे राष्ट्रसंतांचे तत्त्वज्ञान – कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर*
राष्ट्रनिर्माण करण्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तत्त्वज्ञान असल्याचे प्रतिपादन माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी अध्यक्षीय भाषण करताना केले. समाजाला आज खऱ्या अर्थाने महाराजांच्या विचारांची गरज असून त्यांच्या विचाराने मार्गक्रमण केल्यास विकसित भारताच्या दिशेने जाता येईल, असे कुलगुरू डॉ. क्षीरसागर म्हणाल्या. ग्रामगीता लोकांपर्यंत पोहोचल्यास राष्ट्राच्या विकसित होण्याची दिशा जनतेला समजेल असे सांगत मोझरी येथील भेटीची माहिती कुलगुरूंनी यावेळी दिली.
*समाज सेवेलाच ईश्वर सेवा मानली – डॉ. श. नु. पठाण*
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाज सेवेलाच ईश्वरसेवा मानली, असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. श. नु. पठाण यांनी केले. सर्व संतांनी ईश्वरभक्तीचा मार्ग दाखविला तर राष्ट्रसंतांनी राष्ट्रभक्तीचा भाव जनतेमध्ये निर्माण केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतूनच घडलो असल्याचे सांगत राष्ट्रसंतांचे विचार संपूर्ण देशात प्रसारित करण्याची जबाबदारी विद्यापीठावर असल्याचे डॉ. पठाण म्हणाले. लातूर येथे निर्माण करण्यात आलेल्या मानवता भवनाची देखील त्यांनी यावेळी माहिती दिली.
प्रास्ताविक तथा स्वागतपर भाषण करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांनी सहाव्या साहित्य संमेलनात सर्व उपस्थितांचे स्वागत केले. वाङ्मय सेवा ही सर्वात मोठी सेवा असल्याचे सांगत राष्ट्रसंतांचे साहित्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे याकरिता या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामीण जनतेला कळावे, असे साहित्य राष्ट्रसंतांनी निर्माण केले असून सद्यपरिस्थितीला उपयुक्त असे वळण देण्याचे कसब राष्ट्रसंतांंच्या साहित्यात होते. लोकशिक्षण, सर्वधर्मसमन्वय, राष्ट्रोन्नती आणि विश्वशांती हे राष्ट्रसंतांंच्या विचारांचे अधिष्ठान होते. राष्ट्रसंत ज्ञानाने संपन्न असे चालते-बोलते विद्यापीठ होते असे त्या म्हणाल्या. विद्यापीठात ‘राष्ट्रसंत संग्रहालय’ लोकसहभागातून उभारले जात असून याकरिता मदत करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. उद्घाटन कार्यक्रमाला प्रकाश महाराज वाघ, ज्ञानेश्वर रक्षक,अशोक यावले,सुबोध दादा,बाबाराव पाटील, सर्व प्राधिकरणीचे सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व गुरुदेवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्यावर लिखित सृजनशिल्प ग्रंथाचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी विद्यापीठ परिसरात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथदिंडीमध्ये ग्रामगीता तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या श्री गुरुदेव मासिकाचा पहिला अंक ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार प्रा. वर्षा पाटील यांनी मानले.





