28 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home गुन्हेवार्ता पवनीतील सावकार दांपत्याची दादागिरी, दोघांकडून केली बळजबरीने व्याजाची वसुली

पवनीतील सावकार दांपत्याची दादागिरी, दोघांकडून केली बळजबरीने व्याजाची वसुली

0
55

भंडारा : जिल्ह्यात बेकायदेशीर सावकारीविरोधात कारवाई करत पोलिसांनी धमक्या देऊन व्याज वसूल केल्याप्रकरणी सावकार दांपत्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार पवनी येथे उघडकीस आला.संदेश खोब्रागडे (४०) आणि रेखा खोब्रागडे (३२) अशी या अवैध सावकार दांपत्याची नावे आहेत. पोलिसांच्या मते, या दाम्पत्याने १० टक्के व्याजदराने पैसे उधार देऊन आर्थिक शोषण केले. मूळ रकमेपेक्षा जास्त रक्कम वसूल करूनही कर्जदारांना धमकावल्याची गंभीर बाब तपासात पुढे आली आहे.
पवनी येथील रामपुरी वॉर्डमधील रहिवासी तक्रारदार विशाखा नागपुरे(४४) यांनी पाच वर्षांपूर्वी रेखा खोब्रागडे यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. १० टक्के व्याजदराने हा व्यवहार ठरला होता.नागपुरे यांनी आतापर्यंत व्याजासह एकूण १३ लाख ८० हजार रुपये परत केले. तरीही, रेखा खोब्रागडे यांनी नागपुरे यांच्या घरी जाऊन तिला शिवीगाळ केली आणि तिच्यावर घरातील वस्तू फेकून मारल्या.
पवनी पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि ३५१(२) आणि महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक प्रीतम येवले या प्रकरणाचा तपास करत आहेत. नागरिकांचे पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
दोघांवरही स्वतंत्र गुन्हे
दोन्ही गुन्हे शनिवार, ७ मार्च रोजी पवनी पोलिसांनी दाखल केले. विशेष म्हणजे, खोब्रागडे पती-पत्नीवर स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले. ठाण्यात दाखल करण्यात आले. या बेकायदेशीर सावकारी प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
कोणी बेकायदेशीर सावकारी करत असेल, जास्त व्याजासाठी दबाव आणत असेल किंवा त्यांना धमकावत असेल तर त्यांनी संकोच न करता ताबडतोब जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
३.३० लाखांच्या कर्जावर ३.४३ लाख व्याज !
दुसऱ्या घटनेत, पवनी येथील गणेश वॉर्ड येथील रहिवासी तक्रारदार शैलेंद्र कुर्वे (४०) यांनीही संदेश खोब्रागडे यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.१० टक्के व्याजदराने ३ लाख ३० हजार रुपये कर्ज घेतले. कुर्वे यांनी आतापर्यंत एकूण ३ लाख ४३ हजार रुपये केवळ व्याजापोटी दिले आहेत. असे असूनही, खोब्रागडे यांनी पूर्वी घेतलेल्या कोऱ्या चेकवर स्वतः ३ लाख रुपये लिहून बँकेत जमा केले, मात्र ते बाउन्स झाले. त्यानंतर त्याने त्यांना वारंवार चेक बाउन्सचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची तक्रार आहे. या प्रकरणातही पूर्वीच्या गुन्ह्यातील कलमा दाखल लावण्यात आल्या आहेत.

blank