गोंदिया : जिल्ह्यात धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून खरेदी करण्यात आलेल्या धानाचे चुकारे द्या यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.९) जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यात खरीप हंगामात धानाचे उत्पन्न जवळपास ८२ टक्के झाले असून, शेतकऱ्यांनी धान विक्रीकरिता प्रत्येक धान खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करून धान पाठविले आहे. परंतु, नोंदणी केल्याप्रमाणे धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण न दिल्यामुळे शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यात आला नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, वारंवार धरणे, आंदोलने करण्यात आले आहे. धान खरेदीसंदर्भात वारंवार शासनस्तरावर पाठपुरावा करूनही त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. अशात धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविणे तसेच खरेदी केलेल्या धानाचे चुकारे देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.९) जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, उपाध्यक्ष अशोक चौधरी, अमर वन्हाडे, आनंद लांजेवार, शैलेश जायस्वाल, शिव नागधरे, रोशन बडोले, मधुसूदन दोनोडे, जितेंद्र रहकवार, जितेश राणे, हितेंद्र मेंढे, रमेश टेंभरे, राधेलाल पटले, दामोदर नेवारे, सिद्धार्थ गणवीर, नामदेव नाईक, पूनमप्रसाद लिल्हारे, दुलीचंद बिसेन, रूपेश खोब्रागडे, तारेश्वर चौधरी, रेवाशंकर पटले, राजू काळबांधे, देवचंद बिसेन, विजय फुंडे, राजू दोनोडे, संजय बहेकार, डेमेन्द्र रहांगडाले, अजय हनवते, रवी चुटे, कृष्णकुमार भावे, डॉ. झामसिंह बघेले, गंगाधर परशुरामकर, पी. जी. कटरे यांचा समावेश होता.





