
गोंदियाः रेल्वे आरक्षित तिकीटांच्या अवैध व्यापाराविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोठी कारवाई करत नागपूर विभागात चार दिवसांत ७ तिकीट दलालांना अटक केली आहे. यामध्ये गोंदिया येथील दलालाचा समावेश असून त्याच्याकडून १५ तत्काळ व प्रीमियम तत्काळ आरक्षित ई-तिकीट आढळून आली. या तिकीटांची एकूण किंमत ७५,२९९ एवढी आहे. आरपीएफने अजय कावळे, रा. गोंदिया याला ताब्यात घेत त्याच्याजवळील मोबाईल फोनही जप्त केला आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूरचे महानिरीक्षक तथा प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त मुन्नवर खुर्शीद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागपूर मंडळाचे मंडल सुरक्षा आयुक्त दीप चंद्र आर्य यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. ६ मार्चते ९ मार्च २०२६ दरम्यान नागपूर मंडळातील विविध ठिकाणी तपास करण्यात आला. या तपासादरम्यान काही व्यक्ती वैयक्तिक आयडीचा वापर करून आरक्षित ई-तिकीट तयार करून जादा दराने विक्री करत असल्याचे आढळून आले. तपासादरम्यान भोमा, निवारी, महाराजपूर, नवेगाव रेल्वे, राजनांदगाव, लामटा (बालाघाट) आणि गोंदिया येथे वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत अनेक जुनी, लाईव्ह तसेच तत्काळ आरक्षित ई-तिकीट जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत हजारो रुपयांत आहे. मागील चार दिवसात रेल्वे सुरक्षा बलने तिकीट काळाबाजार प्रकरणी सात दलालांना अटक केली आहे. यामध्ये गोंदिया येथील अजय कावळे याला अटक करण्यात आली आहे. अजय कावळे याच्या यांच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता त्यामध्ये १५ तत्काळ व प्रीमियम तत्काळ आरक्षित ई-तिकीट आढळून आली. या तिकीटांची एकूण किंमत ७५, २९९ इतकी असल्याचे समोर आले. यावेळी संबंधित मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. या प्रकरणात आवश्यक कारवाई केली असून नागपूर मंडळाकडून रेल्वे तिकीटांच्या काळाबाजारावर आळा घालण्यासाठी अशी मोहीम पुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या कारवाईदरम्यान दलालांकडून मोठ्या प्रमाणात ई-तिकीट, मोबाईल फोन, संगणक व लॅपटॉप जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून तयार केलेली ई-तिकीट, मोबाईल, संगणक आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले. संबंधितांविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत गुन्हे नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. रेल्वे तिकीटांची काळाबाजार किंवा अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या आरपीएफ स्टेशन किंवा रेल्वे हेल्पलाईन क्रमांकांवर तक्रार करावी, असे आवाहन रेल्वे सुरक्षा बलने प्रवाशांना केले आहे





