लाखांदूर,दि.१३ मार्च: शेतीची कामे वेळेवर पूर्ण व्हावीत याकरीता घेतलेली बैलजोडीच शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण ठरल्याची हृदयद्रावक घटना लाखांदुर तालुक्यातील मांदेड येथे आज १३ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.या घटनेत शेतकरी मधुकर नामदेव राऊत (40) यांचा शेतात चिखलणी करत असताना बैलजोडीने ओढत नेल्यामुळे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.ही संपूर्ण घटना मधुकर यांच्या पत्नीने आपल्या डोळ्यांनी पाहिली. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र शेजारील शेतकरी धावून येईपर्यंत मधुकरने अखेरचा श्वास घेतला होता. लाखांदुर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.
प्राप्त माहितीनुसार, मधुकर राऊत यांच्याकडे तीन एकर शेती असून, त्यापैकी दीड एकर त्यांच्या वाट्याला होती. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच कर्जाची तडजोड करून बैलजोडी खरेदी केली होती. त्या माध्यमातून ते आपल्या शेतात पारंपारिक पद्धतीने मशागत करत होते. आज दुपारी ते स्वतःच्या शेतात धानाच्या रोवणीसाठी लाकडी फण आणि बैलजोडीच्या सहाय्याने चिखलणी करत होते. दरम्यान, अचानक बैल बिथरले आणि त्यांनी मधुकर यांना फणासह ओढत नेले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि चिखलात गुदमरल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.





