23.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ मोबाईलच्या अतिरेक वापरापासून मुलांना दूर ठेवून वाचनाची सवय लावणे आवश्यक – आमदार...

मोबाईलच्या अतिरेक वापरापासून मुलांना दूर ठेवून वाचनाची सवय लावणे आवश्यक – आमदार रामदास मसराम

0
34
**आरमोरी येथे ग्रंथोत्सवाचे द्विदिवसीय आयोजन; ग्रंथदिंडी मिरवणुकीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
गडचिरोली,दि.15 : आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी मोबाईलसारख्या साधनांचा अतिरेकी व चुकीचा वापर वाढत असून त्याचा लहान मुलांच्या मेंदू व बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होत आहे. जेवताना, झोपताना किंवा मोकळ्या वेळात सतत मोबाईल वापरण्याची सवय वाढत असल्याने पालकांनी वेळीच जागरूक होऊन मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवत वाचनाची सवय लावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार रामदास मसराम यांनी केले.
ग्रंथ संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्वर्गीय नसरुद्दीनभाई पंजाब वाणिज्य महाविद्यालयात १४ व १५ मार्च रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोज वनमाळी होते. यावेळी दीपक वनमाळी, उमाकांत वनमाळी, ज्येष्ठ लेखिका कुसुमताई आलाम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लासिन खालसा, सहाय्यक ग्रंथालय संचालक नागपूर रामदास साठे, जगदीश मस्के, भाऊराव पत्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सु. गजभारे तसेच डॉ. विजय रेवतकर यांची उपस्थिती होती.
ग्रंथोत्सवाच्या प्रारंभी शहरातून ग्रंथदिंडी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत वाचन संस्कृतीचा संदेश दिला. विविध घोषवाक्यांद्वारे वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात मनोज वनमाळी यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शेतकरी जनजागृती, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी ग्रंथोत्सवातील विविध उपक्रमांचा लाभ घेऊन वाचनाची सवय जोपासावी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करावे, असे त्यांनी सांगितले.
दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने परिसंवाद, वाचन संस्कृतीविषयी मार्गदर्शन तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि ज्ञानाधिष्ठित संस्कृती बळकट करणे हा उद्देश असल्याचे यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
०००
blank