
सडक / अर्जुनी.– अर्जुनी-मोर.विधानसभा अंतर्गत सडक / अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथे महसूल विभागातर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर उत्साहात व यशस्वीपणे पार पडले. या शिबिराला अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शासनाच्या विविध सेवा ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी महास्वराज्य समाधान शिबिर हे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे सांगितले.
आमदार बडोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाच्या विचारातून प्रेरणा घेत शासनाने सुरू केलेले हे अभियान नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिला व सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी अशा शिबिरांचे आयोजन महत्त्वाचे आहे. शासनाच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या, ७/१२ उतारे दुरुस्ती, फेरफार प्रकरणे, जमीन महसूल तक्रारी, रहिवासी-उत्पन्न-जात प्रमाणपत्रे, आधार लिंकिंग, लोकसेवा हक्कांतर्गत प्रलंबित अर्ज आदी अनेक प्रकरणांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांच्या जुन्या फेरफार प्रकरणांना मंजुरी मिळाली, तर महिलांना विधवा व ज्येष्ठ नागरिक योजनांसाठी अर्ज भरून घेण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
शिबिरात उपस्थित महसूल अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे अनेक प्रकरणांवर तत्काळ कारवाई करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक व नागरिकाभिमुख होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योतीताई कांबळे, कृ.उ.बा.स. चे सभापती डॉ. अविनाश काशिवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती शालिंदर कापगते, तहसीलदार आनंद जाधव, गौरेशजी बावणकर, कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार, नायब तहसीलदार जे. डी. जांभुळकर तसेच विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





