गोरेगाव- तालुक्यातील गोवारीटोला येथे संत तुकाराम महाराज बीजोत्सव थाटात साजरा करण्यात आला. आजपर्यंत या गावाच्या इतिहासात जि.प. अध्यक्ष पदावरील कोणत्याही मान्यवरांची उपस्थिती लाभली नव्हती. मात्र यंदा संत तुकाराम महाराज बीज दिवसाच्या पवित्र निमित्ताने गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी प्रथमच गोवारीटोला गावाला भेट दिली. त्यांच्या आगमनामुळे गावात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविताना भेंडारकर यांनी एकता, सद्भावना, समाजसेवा आणि विकासाच्या मार्गावर ठामपणे चालण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रभावी आणि संवेदनशील भाषणामुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये नवी ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण झाली. या पवित्र प्रसंगी पारंपरिक पद्धतीने दहीकाला पूजन करून संत परंपरेचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान भक्तिमय वातावरणात भजन, कीर्तन आणि आध्यात्मिक संदेशांनी उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला जि.प. गोंदियाचे बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत तसेच पंचायत समितीचे माजी सभापती मनोज बोपचे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात हिरकण्या मेहंदळे, प्रभुदास पारधी,तोरणकर, राधेश्याम पटले आणि नरेंद्र पटले यांचेही मार्गदर्शन लाभले. कीर्तन व प्रवचनातून संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीचा आणि भक्तीपरंपरेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.





