26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home महाराष्ट्र युवक बिरादरीच्या वार्षिक कार्यक्रम, युवा भूषण पुरस्कारांनी तरुणांचा गौरव

युवक बिरादरीच्या वार्षिक कार्यक्रम, युवा भूषण पुरस्कारांनी तरुणांचा गौरव

0
39

मुंबईत देशभरातील तरुणांचा संसदीय चर्चेत सहभाग

मुंबई:दांडी यात्रेच्या सुरुवातीच्या आठवणीत दरवर्षी युवक बिरादरीचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यामध्ये यंदा युवा भूषणसह ‘अभिरूप युवा संसद’ या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाची अंतिम फेरी गुरुवारी मुंबईत उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात महाराष्ट्रासह देशातील २००० युवकांनी सहभाग घेतला होता. यापैकी अंतिम फेरीत विविध भागांतील २८ तरुण निवडले गेले होते. युवा संसदेत “सत्ता समतोल: केंद्र आणि राज्य संबंधांवर पुनर्विचार तसेच कर्तव्य विधायक बील, २०२६” या समकालीन विषयांवर संसदीय पद्धतीने चर्चा करण्यात आली. संघराज्य व्यवस्था, संविधानिक मूल्ये आणि जबाबदार युवा नेतृत्व याविषयी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले अर्थतज्ञ, माजी कुलगुरू आणि माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव, माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, युवक बिरादरीचे चेअरपर्सन आणि मणक्याचे देशातील प्रख्यान सर्जन डॉ. राम चढ्ढा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मान्यवर पाहुण्यांसह युवक बिरादरीचे कार्यकारी महासंचालक सुनील वालावलकर, व्यवस्थापकीय विश्वस्त स्वर क्रांती मंचावर उपस्थित होत्या. याप्रसंगी मान्यवरांचे मार्गदर्शन आणि पुरस्कार प्रदान समारंभानंतर ४० कलाकारांनी ‘पुण्यतीर्थ भारत’ ही युवक बिरादरीची अप्रतिम कलाकृती सादर केली.blank

चौकट: या कार्यक्रमात सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल रजनीकांत श्रॉफ, लिली भूषण, घनशाम ढोकरत आणि किरण सावे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शाल, सन्मानपत्र, रौप्यपदक आणि धनादेश देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सोबतच युवा भूषण स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. यामध्ये पंजाबच्या होशियारपूर येथील दिव्या मेनन यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर महाराष्ट्रातील टिटवाळा येथील सर्वेश नायक यांनी द्वितीय आणि मुंबईच्या दहिसर येथील मधु सिंग यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

चौकट: या कार्यक्रमाला मुंबईतील तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटरचे उपसंचालक विलियम जे. एस. वांग यांची विशेष उपस्थिती होती. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती साधना जाधव, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ॲटलस स्किलटेक विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर, निवडणूक आयोगाचे माजी उपायुक्त अविनाश सानस, मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. मृदुल निळे, डॉ. राजेश्वर आंधळे, हुबनाथ पांडे, डॉ. समिना हसन आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम पद्मश्री क्रांती शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री विले पार्ले केळवणी मंडळ यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. ‘अभिरूप युवा संसद’, ‘युवा भूषण’ या उपक्रमातून देशातील तरुणांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता, नागरिक जबाबदारीची भावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन आणि देशभरातील समन्वयासाठी युवक बिरादरीचे नागेंद्र राय, सचिन वाकुळकर, निहार देवरुखकर, प्रा. रवी गावित, वेदांत वैशाली जयंत, संदेश जाधव, निलेश सोनटक्के, चेतन राठोड, आनंद आदींनी विशेष परिश्रम घेतले.

blank