28.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home गुन्हेवार्ता जुन्या वैमनस्यातून युवकाची निर्घृण हत्या

जुन्या वैमनस्यातून युवकाची निर्घृण हत्या

0
208
वडिलांच्या हत्येचा बदला; आरोपीचे आत्मसमर्पण
गोंदिया, १७ मार्च –गोरेगाव तहसील अंतर्गत पालेवाडा हेटी येथे सोमवारी (१६ मार्च) रात्री ८ वाजताच्या सुमारास जुन्या वैरातून एका युवकाची तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत युवकाचे नाव देवेंद्र चुन्नीलाल ताराम (२४) असे असून, तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर कारागृहातून सुटून गावात परतला होता.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी सुनील आसाराम कांबळे (२५) याने जुन्या वैरातून हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी आरोपीच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी देवेंद्र ताराम याच्याविरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्याला अटक करून भंडारा  कारागृहात पाठविण्यात आले होते. आठवडाभरापूर्वी  तो जामिनावर सुटून गावात परतला होता.
दरम्यान, वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याच्या हेतूने आरोपी सुनील कांबळे संधीच्या शोधात होता. देवेंद्र गावात परतल्याची माहिती मिळताच आरोपीने सोमवारी रात्री त्याच्यावर तलवारीने हल्ला चढवला. गळा, मान, हात, पाय व पोटावर सपासप वार केल्याने देवेंद्रचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर आरोपीने थेट पोलिस पाटलांसमोर आत्मसमर्पण केले असून, हत्येसाठी वापरलेले शस्त्रही त्याच्याकडे असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून प्रेत उत्तरे तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तपासादरम्यान आरोपीचा मोठा भाऊ हंसराज कांबळे (४३) यालाही संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.दरम्यान, या निर्घृण हत्याकांडामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, वाढत्या वैरभावना व कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
blank