नियमित खेळ ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्लीच– जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
परभणी, दि. 18 : उत्साह, ऊर्जा आणि स्पर्धात्मकतेच्या वातावरणात जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन आज श्री. शिवाजी महाविद्यालय येथे दिमाखात पार पडले. यंदा मराठवाडा विभागीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद परभणी जिल्ह्याकडे असल्याने या जिल्हास्तरीय स्पर्धांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
खेळ हा केवळ मनोरंजन नसून जीवन घडविण्याची प्रभावी प्रक्रिया आहे. खेळ हा शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य सुदृढ ठेवतो तसेच शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास वाढवतो. प्रत्येकाने दररोज किमान एक तास खेळ किंवा व्यायामासाठी द्यावा, नियमित खेळ ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्लीच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. जाधव, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, शैलेश लाहोटी, संगीता चव्हाण, जीवजराज डापकर, तहसीलदार संदीप राजापुरे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यानंतर आकर्षक पथसंचलन, मशाल प्रज्वलन आणि आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धेचा शानदार शुभारंभ करण्यात आला. खेळाडूंनी दिलेल्या मानवंदनेने संपूर्ण परिसर उत्साहाच्या वातावरणाने भारावून गेला. जिल्हाधिकारी यांनी आगामी सण-उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत सहभागी खेळाडुंनी सर्वोत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. मागील वर्षी परभणी जिल्हा उपविजेता ठरला होता, यंदा विजेतेपद मिळविण्याचे ध्येय ठेवून सर्व खेळाडूंनी खेळाचे चांगले प्रदर्शन करावे. तसेच यंदा मराठवाडा विभागीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद परभणी जिल्ह्याकडे असल्याने बाहेरच्या जिल्हयातून येणाऱ्या खेळाडुंना उत्तम सुविधा देण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचित केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी सहभागी खेळाडुंना शुभेच्छा देत उत्तम खेळाचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले. तसेच अशा स्पर्धांमधून कौशल्य विकसित होऊन व्यक्तिमत्व घडण्यास मोठी मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.
निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी प्रास्ताविक केले. कोणताही खेळ जिंकण्यासाठी खेळला जातो, मात्र त्यासाठी प्रामाणिकपणे आणि मनापासून खेळणे अत्यंत गरजेचे आहे, असे नमूद करुन त्यांनी 2009 साली कृषि विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या विभागीय स्पर्धांची आठवण सांगितली. यंदा तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा परभणीला हा मान मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. दि. 3 ते 5 एप्रिल दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धांद्वारे संघ निवड प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या क्रीडा स्पर्धांमध्ये मैदानी स्पर्धांसह खो-खो (पुरुष व महिला), कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष व महिला), टेबल टेनिस (पुरुष व महिला), रिंग टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, लॉन टेनिस तसेच जलतरण अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करून आगामी विभागीय स्पर्धेसाठी संघ निश्चित केला जाणार आहे.
आभार प्रदर्शन तहसीलदार संदीप राजापुरे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षण प्रवीण वायकोस यांनी केले. खेळ, संस्कृती आणि संघभावनेचा सुंदर संगम अनुभवत परभणी जिल्हा आता विभागीय स्पर्धेसाठी सज्ज झाला असून, या स्पर्धांमधून नव्या उर्जेचा आणि जिद्दीचा संदेश संपूर्ण प्रशासनात पसरताना दिसला.





