# आरोपींमध्ये भीतीचे वातावरण
गोंदिया : राज्यात गाजत असलेल्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचे धागेदोरे आता गोंदिया जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले असून, विशेष तपास पथकाने (SIT) जिल्ह्यात धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, संबंधितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या पथकाने नुकतीच गोंदिया तालुक्यातील महागाव परिसरात अचानक धाड टाकत तपासाला वेग दिला. या धाडीनंतर अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे.
शिक्षकाची ५ तास कसून चौकशी
या कारवाईदरम्यान एसआयटीने महागाव येथील एका शिक्षकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या शिक्षकाला पथकाने एका गोपनीय ठिकाणी नेऊन तब्बल पाच तास सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहार, कागदपत्रांची पडताळणी तसेच ‘शालार्थ आयडी’ मिळवण्याच्या प्रक्रियेतील अनियमितता याबाबत तपशीलवार माहिती घेतल्याचे समजते.
दीर्घ चौकशीनंतर प्राथमिक माहितीच्या आधारे संबंधित शिक्षकाला सध्या सोडून देण्यात आले असले, तरी तपास यंत्रणेच्या रडारवर तो कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
# आरोपी फरार; जिल्ह्यात खळबळ
एसआयटीचे पथक गोंदियात दाखल झाल्याची माहिती समोर येताच या घोटाळ्याशी संबंधित इतर संशयित आरोपींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारवाईच्या धास्तीने अनेकांनी जिल्हा सोडून पलायन केल्याची माहिती आहे. काही आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगात
एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने करण्यात येत असून, डिजिटल पुरावे, बँक व्यवहार, तसेच शासकीय कागदपत्रांची छाननी सुरू आहे. ‘शालार्थ आयडी’ मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे, खोट्या नियुक्त्या आणि आर्थिक गैरव्यवहारांचा मोठा जाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
# “कोणीही सुटणार नाही”; एसआयटीचा इशारा
या प्रकरणात काही आरोपी फरार झाले असले, तरी “कोणालाही वाचवले जाणार नाही,” असा कडक इशारा तपास यंत्रणेकडून देण्यात आला आहे. फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.
# शिक्षण विभागातील संगनमताची शक्यता?
या घोटाळ्याचे मूळ किती खोलवर गेले आहे, तसेच शिक्षण विभागातील काही अधिकारी किंवा कर्मचारी यांचा यात सहभाग आहे का, याचाही तपास एसआयटी करत आहे. तपासाचा कक्ष वाढण्याची शक्यता असून, आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची चिन्हे आहेत. एकूणच, ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एसआयटीच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





