26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home Featured News नक्षल चळवळ सोडून नंदूने परत यावे,डाव्या पक्षांचेही माओवाद्यांना आवाहन

नक्षल चळवळ सोडून नंदूने परत यावे,डाव्या पक्षांचेही माओवाद्यांना आवाहन

0
128
माओवादी नंदूच्या घरी त्याच्या वडीलांशी चर्चा करताना डाव्या पक्षांचे पदाधिकारी

गडचिरोली : जिल्ह्यात पोलिसांच्या रेकॅार्डनुसार शिल्लक असलेल्या 6 माओवाद्यांपैकी जयराम उर्फ नंदू मोंगे गावळे हा एकमेव गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. उर्वरित 5 जण हे छत्तीसगडचे रहिवासी आहेत. नक्षलवाद्यांचे सर्व मोठे नेते दलम सोडून गेले. आता जंगलात राहण्यापेक्षा चळवळ सोडून नंदूने घरी परत यावे, असे भावनिक आवाहन जयराम उर्फ नंदूचे वडील मोंगो गावळे यांनी केले आहे.

एट्टापल्ली तालुक्यातील गिलनगुडा गावातील गावळे यांच्या घरी जाऊन शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, भारतीय कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार यांनी माओवादी नंदूच्या वडीलांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी हे आवाहन नंदूला उद्देशून केले.अनेक वर्षांपूर्वी घरकामाबद्दल रागावल्याच्या कारणावरून नंदू घर सोडून गेला आणि नक्षल दलममध्ये भरती झाला. तेव्हापासून तो घरीच आलाच नाही, अशी माहिती मोंगे गावळे यांनी दिली.

डाव्या पक्षांचेही माओवाद्यांना आवाहन

भारत हा लोकशाहीवादी देश असून संविधानिक पध्दतीने चालत आलेला आहे. येथे बंदुकीच्या जोरावर सामान्य माणसाला न्याय मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे जंगलात उरलेल्या नक्षलवाद्यांनी बंदुकीचा मार्ग सोडून लोकशाही मार्ग स्विकारावा, असे आवाहन गडचिरोलीतील डाव्या पक्षांची केले आहे. देशाच्या गृहविभागाने 31 मार्च हा नक्षलवाद्यांसाठी शेवटचा अल्टीमेटम दिला होता. या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्याच्या संपर्क दौऱ्यावर असलेले शेकाप आणि माकपा-भाकपाच्या पदाधिकाऱ्यांनी गिलनगुडा येथे जाऊन नंदूचे वडील मोंगे गावळे यांच्याशी चर्चा केली. जयरामने बंदुकीचा त्याग करून लोकशाहीचा मार्ग स्विकारावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बंदुकीच्या जोरावर संघर्ष करण्याऐवजी डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली संसद, विधिमंडळ आणि रस्त्यावरचा संघर्ष करावा. बंदुकीचा त्याग करून लोकशाही मार्गाने जनतेसाठी कामे करु इच्छिणाऱ्यांचे, आत्मसमर्पितांचे आम्ही आमच्या पक्षात स्वागत करु. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा नक्षलवादी आणि त्याच्या समर्थकांनी बंदुकीचा त्याग करावा, असे आवाहनही रामदास जराते, अमोल मारकवार, सचिन मोतकुरवार, सुरज जक्कुलवार यांनी केले आहे.