अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील धाबेटेकडी आदर्श येथे शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावावर एका युवकाची ६ लाख ७५ हजार रूपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची तक्रार अर्जुनी मोरगाव पोलिसात करण्यात आली असून तपास सुरू आहे.
सविस्तर असे की, धाबेटेकडी (आदर्श) येथील रहिवासी प्रेमचंद एकनाथ कुंभरे यांना पंचायत समितीमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देण्यात आले. आरोपी ललित जनार्दन कुंभरेव सुग्रेश तागडे (रा. बाम्हणी खडकी) यांनी संगनमत करून १ मे २०२४ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण ६ लाख ७५ हजार रुपये रोख स्वरूपात स्वीकारले. नोकरी लागेल या आशेवर फिर्यादीने मोठी रक्कम दिली; मात्र बराच काळ
उलटूनही कोणतीही नियुक्ती न झाल्याने संशय निर्माण झाला. वारंवार पाठपुरावा करूनही टाळाटाळ केली जात असल्याने अखेर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी फिर्यादीने अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नोकरीच्या आमिषाला बळी पडणाऱ्या युवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही सरकारी किंवा खासगी नोकरीसाठी पैसे देण्याआधी संबंधित बाबींची खातरजमा करावी आणि अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे





