
५ वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास व १२ हजारांचा दंड
विशेष सत्र न्यायालयाचा निकाल
गोंदिया, दि. ९ एप्रिल-मतीमंद तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी गोंदिया येथील विशेष सत्र न्यायालयाने आरोपीस नराधमास कठोर शिक्षा सुनावली. अमोल रामेश्वर तलांजे (३०), रा. बोळदे/करड, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आजीवन कारावासासह ५ वर्षे सश्रम कारावास व एकूण १२ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-३ तथा विशेष सत्र न्यायाधीश के. एन. गौतम यांनी दिला.आरोपी अमोल हा पीडितेच्या घराशेजारी राहत होता. पीडिता मतीमंद असल्याचा गैरफायदा घेत त्याने पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा करून तिच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर जबरदस्तीने तिला खाटेवर झोपवून तिच्यावर अत्याचार केला.घटनेनंतर पीडितेने आपल्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावरून २१ ऑक्टोबर २०२१ रोजी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तपासादरम्यान आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले.या खटल्यात सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता कैलासकुमार आर. खंडेलवाल यांनी १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवून आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर केले. बचाव व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरविले.
न्यायालयाने भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (२)(एल) अंतर्गत : आजीवन कारावास व १० हजार रुपये दंड (दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावास)कलम ४५२ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त सश्रम कारावास) अशी शिक्षा ठोठावली.
या प्रकरणात पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के तसेच कोर्ट पैरवी अधिकारी कृष्णकुमार अंबुले यांनी प्रभावी कामगिरी बजावली.





