गोंदिया -जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत एका अट्टल चोराला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. या आरोपीकडून अर्जुनी-मोर पोलीस ठाण्यासह भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण सहा गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीतील १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. २८ जुलै २०२६ रोजी अर्जुनी-मोर पोलीस ठाण्यातील मौजा बोंडगावदेवी येथील केशव प्रकाश झोळे यांनी घरफोडीची तक्रार दाखल केली होती. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी अर्जुनी-मोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे प्रवीण उर्फ डकैत (वय ३०, रा. टिळक वॉर्ड, मोहाडी, जि. भंडारा) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अर्जुनी-मोर, साकोली, लाखनी, देसाईगंज आणि रामनगर (जि. चंद्रपूर) परिसरातील घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपीकडून पोलिसांनी रोख रक्कम २५ हजार रुपये, एक रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल (किंमत २५ हजार रुपये) तसेच होंडा सीबी शाईन मोटारसायकल (किंमत ६६ हजार रुपये) असा एकूण १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीस पुढील तपासासाठी अर्जुनी-मोर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. अमरदीप खाडे, पोहेकॉ. तुलसीदास लुटे, पोहेकॉ. अमित तिवारी, पोहेकॉ. प्रकाश गायकवाड, पोहेकॉ. हितेंद्रकुमार दाते, पोहेकॉ. रोशन चेरे, पोहेकॉ. योगेश राऊत, पोहेकॉ. देवेंद्र उके, पोहेकॉ. वंदना बिसेन, पोशि. योगेश रहिले, पोशि. अनिकेत चांदवाडे व अर्पण बजारी यांच्या पथकाने केली.
Home गुन्हेवार्ता घरफोडी करणारा अट्टल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात,सहा गुन्ह्यांची उकल;१ लाख २६...





