तिरोडा : काचेवानी येथील वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या समस्यांची गंभीर दखल घेत, आमदार विजयभाऊ रहांगडाले यांनी प्रशासकीय यंत्रणेला कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालय, तिरोडा येथे आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.काचेवानी परिसरात सार्वजनिक जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढल्याने विकासाच्या कामात अडथळे येत असून ग्रामस्थांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत आमदार रहांगडाले यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. ‘सार्वजनिक जमिनींवर कोणाचीही मनमानी खपवून घेतली जाणार नाही. जनतेच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि परिसराच्या सुव्यवस्थित विकासासाठी ही अतिक्रमणे तातडीने व प्रभावीपणे हटवण्यात यावीत,’ असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.
प्रशासनाने कोणत्याही दबावापोटी न येता नियमांचे काटेकोर पालन करून कारवाई करावी, असेही आमदारांनी बजावले. या बैठकीला विविध विभागांचे शासकीय अधिकारी, काचेवानी ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव, सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या निर्णयामुळे काचेवानी येथील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला आता वेग येणार असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.





