27.7 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ शेतकरी उत्पादक कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट; विविध कृषी प्रकल्पांची पाहणी

शेतकरी उत्पादक कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट; विविध कृषी प्रकल्पांची पाहणी

0
47

वाशिम, दि.10 एप्रिल-जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटांच्या विविध प्रकल्पांना भेट देत कृषी क्षेत्रातील उपक्रमांचा सखोल आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

या दौऱ्यावेळी परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरिफ शाह,आत्मा प्रकल्प संचालक  अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, तंत्र अधिकारी संतोष थोरात तसेच सीएम फेलो संकेत नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दौऱ्याची सुरुवात ॲग्रो नेचर फार्मर प्रोड्युसर कंपनी, वाशिम येथील ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळेच्या पाहणीने झाली. त्यानंतर मौजे साखरा येथील पंढरीनाथ शेतकरी उत्पादक कंपनी लि. येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या गोडाऊनसह मानव विकास मिशन अंतर्गत माती प्रयोगशाळा व शेतकरी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करण्यात आली.

या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जैविक निविष्ठांची निर्मिती करून सदस्यांना उपलब्ध करून दिली जाते, तसेच सेंद्रिय शेतमालाची विक्री केली जात असल्याची माहिती कंपनीचे संचालक पांडुरंग राऊत यांनी दिली. यावेळी वाशिम शेती शिल्प कृषी विपणन कक्षामार्फत सेंद्रिय तूर विक्रीसाठी जाणाऱ्या वाहनाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

यानंतर नैसर्गिक व एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणारे शेतकरी दीपक सुभाष वारकड यांच्या प्रकल्पाला भेट देऊन विविध नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याच्या पद्धतींची पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांचे कौतुक करून इतर शेतकऱ्यांनीही नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच एमआयडीएच अंतर्गत उभारलेल्या पॅक हाऊसचे उद्घाटनही करण्यात आले.

श्री शृंगऋषी शेतकरी मंडळ, अनसिंग येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटकांतर्गत उभारलेल्या गांडूळ खत युनिटची पाहणी करण्यात आली. गटाचे संचालक राजू इंगळे यांना इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यानंतर ढगे फार्मर प्रोड्युसर कंपनी, अनसिंग येथील डेअरी प्रकल्पाला भेट देऊन दुग्धजन्य पदार्थ प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच शिवशक्ती शेतकरी बचत गट, शेलू खुर्द येथे औजारे बँक प्रकल्पाची पाहणी करून ट्रॅक्टर व विविध शेती अवजारांची माहिती घेण्यात आली.

दौऱ्याच्या शेवटी योगायोग शेतकरी उत्पादक कंपनी, बाबुळगाव येथे चिया स्वच्छता व प्रतवारी युनिटची पाहणी करण्यात आली. या दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास विभागातील ग्रामपंचायत अधिकारी तसेच आत्मा अंतर्गत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी पुढाकार घेतला.