
गोरेगाव- बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा खिसा कापून मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्याला गोरेगाव पोलिसांनी अवघ्या दोन तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी १६ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि ४ हजार रुपये रोख जप्त केले. आरोपीकडून एका जुन्या गुन्ह्यातील चोरीची दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी फिर्यादी हे गोरेगाव बस स्टॉपवरून आपल्या गावाला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि रोख ४ हजार रुपये चोरून नेले. फिर्यादीच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सुरू होताच पोलीस पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक पुराव्यांचा प्रभावी वापर करत संशयित आरोपी साहिल इसराइल शेख (१९) रा. संजय नगर, गोंदिया) याला तातडीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, अधिक चौकशी दरम्यान आरोपीने गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या एका जुन्या गुन्ह्यातील मोटरसायकल देखील चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी ती दुचाकीही जप्त केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २ तासांच्या आरोपीला अटक करून दोन गुन्हे उघडकीस आणण्यास गोरेगाव पोलिसांना यश आले आहे.





