25.1 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ पालिकेच्या अंगणातच शिक्षण महर्षीची अवहेलना

पालिकेच्या अंगणातच शिक्षण महर्षीची अवहेलना

0
40

गोंदिया : संपूर्ण शहराला स्वच्छतेचे धडे देणाऱ्या गोंदिया नगर परिषद प्रशासनाचा ‘दिव्याखाली अंधार’ उघड झाला आहे. नगर परिषद कार्यालय परिसरात असलेली शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांची प्रतिमा सध्या धुळीने माखलेली असून परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. ज्या कार्यालयातून शहराच्या स्वच्छतेचे नियोजन केले जाते, तिथेच महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
गोंदिया नगर परिषदेने शहराच्या सौंदर्गीकरणावर आतापर्यंत लाखो रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, या सौंदर्याकरणाचा देखभालीशी कोणताही संबंध नसल्याचे चित्र दिसत आहे. स्वतःच्या कार्यालय परिसरात असलेल्या स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेची नियमित स्वच्छता करण्याची तसदीही प्रशासन घेत नसल्याचे समोर आले आहे. प्रतिमेवर साचलेली धूळ आणि आजूबाजूला पडलेला कचरा पाहून, जे प्रशासन स्वतःचे कार्यालय स्वच्छ ठेवू शकत नाही, ते संपूर्ण शहराची स्वच्छता काय करणार? असा प्रश्न  नागरिक उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, शहरातील विविध भागांत असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांची निगा राखण्याची जबाबदारी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाची असते. अग्निशमन दलाच्या गाड्यांद्वारे या प्रतिमा वेळोवेळी धुणे अपेक्षित असताना, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या प्रतिमा धुळीने माखल्या आहेत. केवळ जयंती किंवा पुण्यतिथीच्या दिवशीच प्रतिमांची स्वच्छता करायची का? असा सवाल आता विचारला जात आहे. लाखो रुपये खर्च करून स्मारके आणि पुतळे उभारले जातात, पण त्यांच्या नियमित देखभालीसाठी प्रशासनाकडे यंत्रणा नाही का? की केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठीच सौंदर्याकरणाचे घाट घातले जातात? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शहरातील सर्व महापुरुषांच्या प्रतिमांची नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे