गोंदिया,दि.१२: निसर्गाच्या कुशीत मुक्त संचार करणाऱ्या वनराजालाच मानवी दुर्लक्षाचा बळी जावे लागल्याची हृदयद्रावक घटना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर परिसरात उघडकीस आली आहे. तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही बिट अंतर्गत कोडेलोहारा परिसरात एका शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून सुमारे ४ ते ५ वर्षे वयाच्या वाघाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज रविवार सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.या घटनेने वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील उघड्या विहिरींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोडेलोहारा येथील शेतकरी रुपचंद इसन कावळे यांच्या शेतातील विहिरीत वाघ पडल्याची माहिती मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे जलद बचाव पथक आणि भंडारा वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.नवेगाव नागझिराचे उपसंचालक प्रितमसिंग कोडापे, सहायक वनसंरक्षक विजय धांडे, कु. मनिषा चव्हाण, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी रविकमल भगत आणि कु. टेंभरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक तपासात असे समोर आले की, वाघ हा शिकार करताना एखाद्या भक्ष्याचा पाठलाग करत असताना अचानकपणे कठडे नसलेल्या विहिरीत पडला असावा. या विहिरीची उघडी रचना आणि सुरक्षिततेचा अभाव हा या दुर्घटनेचा मुख्य कारणीभूत घटक ठरत असल्याचे वनाधिकाऱ्यांचे मत आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी गोंदवले यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शवविच्छेदनासाठी NTCA चे प्रतिनिधी, वन्यजीव रक्षक आणि पशुवैद्यकीय अधिकारी प्रविण सोनवाणे,मेघराज तुलावी उपस्थित होते.सदर प्रकरणात पुढील तपास कु. मनिषा चव्हाण, सहायक वनसंरक्षक, नविन नागझिरा यांच्या नेतृत्वाखाली श्री. रविकमल भगत, वनपरिक्षेत्र अधिकारी तिरोडा (वन्यजीव) व त्यांचे चमू करीत आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास सहायक वनसंरक्षक मनिषा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्रअधिकारी रविकमल भगत व त्यांची चमू करीत आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शेतातील उघड्या विहिरींना कठडे बांधण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.





