पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचे आगमन
महानिर्मितीला दीर्घघकालीन व स्थिर कोळसा पुरवठा लोड शेडींगपासून मुक्तता*विजेचे दर कमी होण्यास मदत
नागपूर, दि. 4: राज्यातील ऊर्जा सुरक्षितेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उच्च दर्जाच्या कोळसा खाणीमुळे कोळशाचे अवलंबित्व कमी होणार आहे. तसेच पर्यावरणाच्या संवर्धनासोबत विजेचे दर कमी होऊन भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
महानिर्मितीच्या छत्तीसगड राज्यातील गारे पालमा सेक्टर -2 कोळसा खाणीतून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या कोळसा रेल्वेरॅक चे आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी रेल्वेरॅकला हिरवी झेंडी दाखवून कोळसा हातळणी प्रकल्पाची पहाणी केली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानिर्मितीचे अध्यक्ष राघाकृष्णन बी, संचालक अभय हरणे, कार्यकारी संचालक नितीन वाघ, गारे पालमा कोळसा खाणीचे मुख्य अभियंता शैलेश पडोळे, कोराडी औष्णीक प्रकल्पाचे मुख्य अभियंता सुदीप राणे, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, गिरीश कुमार, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक दीपककुमार गुप्ता, विनायक गर्गा, आदी पदधकारी व अधिकारी उपस्थित होते.





