27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home गुन्हेवार्ता जमीनीच्या जुन्या वादातून गळा कापून शेतकर्‍यांची हत्या

जमीनीच्या जुन्या वादातून गळा कापून शेतकर्‍यांची हत्या

0
256

विधीसंघर्ष बालकासह सहा आरोपींना नागपूरच्या बुट्टीबोरी येथून अटक

गोंदिया -गोरेगाव तालुक्यातील मलपुरी येथील उसेन सेवकराम रहांगडाले या Farmer murdered शेतकर्‍याचा मृतदेह गळा कापलेल्या स्थितीत आढळून आल्याची घटना गावातील शेतशिवारात शनिवारी १८ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. गळ्यावर धारदार वस्तूने कापल्याचे व्रण असताना शेजारीच दगडी फरशी असल्याने सदर घटना हत्या की अपघात असा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांनी काही तासातच या घटनेचा उलगडा केला असून जमीनीच्या जुन्या वादातून त्यांची हत्या करण्यात आल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी १९ एप्रिल रोजी एका विधी संघर्ष बालकासह सहा आरोपींना नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथून अटक केली आहे.

मृत उसेन रहांगडाले हे शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या गुरांना घेऊन शेताकडे गेले होते. मात्र, काही वेळानंतर गावालगत असलेल्या नव्या तलाव परिसरात दगडी फरशीवर त्यांचा मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी मृताची पत्नी विमलाबाई उसेन रहांगडाले यांच्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य पाहता घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पथकाने गुप्त व तांत्रिक माहितीच्या आधारे काही तासातच या प्रकरणाचा उलगडा केला असून सदर खून आरोपी हेमराज चैतराम रहांगडाले व त्याचा मुलगा राहुल हेमराज रहांगडाले दोन्ही राहणार सुकळी बेलदार (बुट्टीबोरी) जि. नागपूर यांनी केल्याचे उघडकीस आले. या आधारे स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने रविवारी १९ एप्रिल रोजी दोघांनाही बुट्टीबोरी येथील त्यांच्या घरून ताब्यात घेत सखोल चौकशी केली. यावर मृतक व आरोपी यांच्यात घराच्या जागेवरून पाच वर्षांपासून वाद सुरु असून याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्याकडे कामावर असलेले मध्यप्रदेशातील आरोपी राहुल जगराम कुंभरे (२३) रा. हनोतिया, जि. छिंदवाडा, करण जगदिश नर्रे (२४) अभिषेक फुलनसा नर्रे (१९) दोही रा. पटनिया ता. जुन्नारदेव जि. छिंदवाडा, व एक विधीसंघर्ष बालक रा. मयारी ता. जुन्नारदेव जि. छिंदवाडा यांच्यासह मिळून कट रचून उसेन रहांगडाले यांचा खून केल्याचे कबूल केले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाईसाठी गोरेगाव पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे
आठ दिवसांपूर्वीच रचला कट

आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार आठ दिवसांपूर्वीच १० एप्रिल रोजी सर्व आरोपी मलपूरी गावात आले होते. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा कट रचला व ठरल्यानुसार १८ एप्रिल रोजी पहाटेच घटनास्थळ गाठून मृत उसेन यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला.