
गोंदिया जिल्ह्यातील शंभरावर कर्मचाऱ्यांची पेंशन रखडली
गोंदिया,दि.२२ ः महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून अनियमितता आहे. पेन्शन मिळण्यात होत असलेल्या या अनियमिततेमुळे त्यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला असताना मार्च २०२६ मधील पेन्शन रखडल्याने गुंता अधिकच वाढला आहे.गोंदिया जिल्ह्यातील जवळपास १०० पेक्षा अधिक महाराष्ट्र जिवन प्राधिकरण व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी अधिकारी पेंशनपासून वंचित राहिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, पेन्शन देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लेखाशिर्षास मंजुरी घेण्याची जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची असताना त्यास वेळेत मुदतवाढ किंवा मंजुरी न मिळाल्याने ३१ मार्च २०२६ रोजी महालेखाकारांकडून हे लेखाशिर्ष अचानक बंद करण्यात आले. परिणामी पेन्शनसाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊ शकला नाही आणि शेकडो सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक चक्र थांबले.
विशेष म्हणजे, २३ मार्च २०१७ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली असून, त्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल नऊ वर्षांनंतरही ही प्रक्रिया रखडलेली आहे. त्याचबरोबर पेन्शनसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष तयार न केल्याने ही समस्या अधिकच चिघळली आहे.
या विलंबाचा सर्वाधिक फटका जेष्ठ नागरिक असलेल्या सेवानिवृत्तांना बसत आहे. औषधोपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आरोग्याशी तडजोड करावी लागत आहे. काहींवर कर्जाचे ओझे असून, हप्ते वेळेत न भरल्यामुळे वाढत्या व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेषतः चतुर्थ श्रेणीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपजीविका पूर्णतः पेन्शनवर अवलंबून असल्याने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
या संदर्भात संबंधितांनी मुख्यमंत्री तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे वारंवार निवेदने सादर केली आहेत. पेन्शन दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी नियमित मिळावी, तसेच कायमस्वरूपी लेखाशिर्ष निर्माण करून शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.
संघटनेचा आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये असलेली अनियमितता आणि मार्च २०२६ ची रखडलेली पेन्शन यावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास बेमुदत उपोषणासह आत्मदहन करण्याचा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संस्थेने दिला आहे.





