26.5 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home मराठवाडा/खान्देश ‘अक्षरलेणं’ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. लुलेकर

‘अक्षरलेणं’ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. लुलेकर

0
42

छत्रपती संभाजीनगर – मराठी साहित्य मंडळ व माय प्रकाशनाच्या वतीने आयोजित पहिल्या ‘अक्षरलेणं’ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध विचारवंत, समीक्षक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर यांची निवड करण्यात आली आहे.
दिनांक १ मे रोजी लोहा जि. नांदेड येथे सदर साहित्य संमेलन पार पडत आहे. डॉ. लुलेकर यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. ‘आले ढग… गेले ढग’ (कवितासंग्रह), समाजचिंतनपर लेखनात ‘बलुतेदार, गावगाड्याचे शिल्पकार, बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे’, वैचारिक प्रकारात ‘मोगडा, अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा : दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बहुजन संस्कृतीचे जनक : महात्मा जोतीराव फुले, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.’, ‘वेध आणि वेधक, प्रतिभेचे प्रदेश, पंचधारांचा प्रदेश, साहित्याचे सांस्कृतिक संचित, साहित्याचे वर्तन आणि वर्तमान, भंजनाचे भजन, साठोत्तरी साहित्य प्रवाह- भाग १, साठोत्तरी साहित्य प्रवाह-भाग २, भूमिकांचा ऐवज.’ ही समीक्षेची पुस्तके आहेत. ‘मराठवाड्यातील मराठी वाङ्मयाचा इतिहास.’, ‘मराठी व्याकरण आणि लेखन, अनिवार्य मराठी : व्याकरण, लेखन आणि आकलन.’ ही अभ्यासक्रमीय पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ‘मराठवाड्याचे साहित्य, जातक (दत्ता भगत गौरवग्रंथ), निवडक उत्तम कांबळे, दुःखाविषयी निबंध- मुक्ता साळवे, आस्वाद आणि समीक्षा (प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निवडक प्रस्तावना), सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, शेतकर्‍याचा असूड, समग्र वाङ्मय : सावित्रीबाई फुले.’ या पुस्तकांचे त्यांनी संपादनही केलेले आहे. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे दोन पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा साहित्य पुरस्कार, अन्य संस्थांचे साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी डॉ. लुलेकर यांनी हिंगोली येथे पार पडलेल्या १४ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. यासोबत कर्नाटकातील कडोली येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना मिळाला आहे. डॉ. लुलेकर यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.