
राजेश चतुर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; न्यायालय अवमानाचा इशारा
गोंदिया : ग्रामपंचायत फुलचूर व फुलचूर टोला येथील प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाचे पालन न करता प्रभाग रचना करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत माजी जि.प. सदस्य तथा भाजप नेते राजेश चतुर यांनी जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
ग्रामविकास विभागाने १७ फेब्रुवारी २०२६ रोजी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देत राजेश चतुर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक २१३३/२०२६ दाखल केली होती. या याचिकेवर ११ मार्च २०२६ रोजी निर्णय देताना न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले होते की, भूमी अभिलेख अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २ मार्च १९७२, शासन राजपत्र २३ जून १९९४ तसेच जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४(१) नुसार कार्यवाही करावी.तसेच संबंधित प्रक्रिया २८ दिवसांत पूर्ण होईपर्यंत दोन्ही ग्रामपंचायतींची प्रभाग रचना करू नये, असेही न्यायालयाने नमूद केले होते.
मात्र, न्यायालयाचा आदेश असतानाही महसूल अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी मनमानी पद्धतीने प्रभाग रचना करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत राजेश चतुर, शिवनारायण नागपुरे, मुकेश लिल्हारे आणि अशोक चने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली आहे.तक्रारीत २३ एप्रिल २०२६ पर्यंत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात, याकडे दोन्ही गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. योग्य न्याय न मिळाल्यास भूमी अभिलेख अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याविरोधात न्यायालय अवमानाची कारवाई करण्याचा इशाराही राजेश चतुर यांनी दिला आहे.




