25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ जनगणनेसाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

जनगणनेसाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

0
60

गोंदिया, दि.29 : भारत सरकारने वर्ष 2027 मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यात दि.1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना (Self Enumeration) तर 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रत्यक्ष घरभेटीद्वारे जनगणना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जनगणना कार्यास पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी आज झालेल्या पत्रपरिषदेत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जनगणना-2027 बाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी भैय्यासाहेब बेहेरे व जनगणना जिल्हा समन्वयक जितेंद्र कुमार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गोंदावले म्हणाले, या प्रक्रियेत जिल्ह्यातील प्रत्येक घर व व्यक्तीची अचुक नोंदणी केली जाणार असून, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विकास आराखड्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची ठरणार आहे. गोंदिया जिल्हयात एकूण 16 चार्ज जनगणना कार्यालये असून त्यामध्ये 8 तहसिल कार्यालये, 3 नगर परिषद कार्यालये, 5 नगरपंचायत कार्यालये आहेत. गोंदिया जिल्ह्याकरीता एकूण 2250 HLB (House Listing Blocks) निर्माण करण्यात आले असून, जिल्ह्याकरीता एकूण 1 मास्टर ट्रेनर, 44 फिल्ड ट्रेनर, 2392 प्रगणक व 409 पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
दिनांक 1 मे 2026 पासून स्व-गणना (Self Enumeration) सुरु होणार आहे, ज्यामध्ये नागरिकांना वेब पोर्टलच्या माध्यमातून स्वतःची माहिती सुरक्षीतपणे भरता येणार आहे. नागरिकांनी स्व-गणनेसाठी https://se.census.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच घरभेटीवेळी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांना आवश्यक ती माहिती अचुक व प्रामाणिकपणे द्यावी. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णत: गोपनीय ठेवली जाईल व तिचा वापर केवळ सांख्यिकीय कारणांसाठीच करण्यात येईल, असे स्पष्ट कण्यात आले आहे असे ते म्हणाले.
तसेच जनगणना 2027 चा पहिला टप्पा घरयादी व घरगणना दिनांक 16 मे 2026 ते 14 जून 2026 या तीस दिवासाच्या कालावधीत होणार आहे. यामध्ये 33 प्रकारचे प्रश्न विचारुन प्रत्येक घराची माहिती नोंदविली जाईल, तसेच घराची स्थिती, सुविधा आणि मुलभूत माहिती गोळा केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जनगणना ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी केले आहे.