25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ DPDCच्या बैठकीत खासदार राजेंद्र जैन यांनी मांडल्या विकासकामांबाबत विचारला थेट प्रश्न

DPDCच्या बैठकीत खासदार राजेंद्र जैन यांनी मांडल्या विकासकामांबाबत विचारला थेट प्रश्न

0
20

गोंदिया:जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्याचे पालकमंत्री ना. इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीत विकासकामांचा जोरदार धडाका पाहायला मिळाला. या बैठकीत खासदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि जनहितार्थ मुद्दे मांडत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आणि विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा: गोंदिया (कुडवा) येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल कॉलेज) निर्माणाधीन कामाची सद्यस्थिती काय? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. उर्वरित कामे अतिशय दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि तातडीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी प्रशासनाचा कडक आढावा घेतला.

  • खड्ड्यांमुळे बेहाल रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा: भूमिगत गटार (Underground Drainage) योजनेच्या कामांमुळे गोंदिया शहरातील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. या दुरवस्थेकडे लक्ष वेधत संबंधित विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून गोंदियाकरांना खड्ड्यांच्या त्रासातून दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

  • ऑडिटोरियमच्या निधीचा मार्ग मोकळा करा: गोंदिया शहरासाठी प्रलंबित असलेल्या ऑडिटोरियमच्या अतिरिक्त निधीचा प्रश्न तातडीने निकाली काढून कामाला वेग देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

  • भीमनगर-कुंभारेनगर येथे अंडरपास नको, उड्डाणपूलच हवा! भीमनगर–कुंभारेनगर रेल्वे क्रॉसिंग येथे प्रस्तावित असलेल्या अंडरपासऐवजी नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि भविष्यातील वाहतूक कोंडीचा विचार करून तेथे उड्डाणपूल (Flyover) उभारण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी मांडली.

  • तीर्थक्षेत्र व आध्यात्मिक स्थळांच्या विकासासाठी निधीची मागणी:परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर पवित्र अस्थी भीमघाट (गोंदिया),श्रीकृष्ण गौरक्षण, गौशाला परिसर पांजरापोल,गडमाता डुडुमाई देवस्थान (झालुटोला),कोरणी घाट या सर्व प्रमुख धार्मिक व सामाजिक स्थळांच्या विकासासाठी तात्काळ आवश्यक निधी उपलब्ध करून कामांचा धडाका सुरू करण्याची मागणी खासदार जैन यांनी लावून धरली.

प्रशासनाला कामाला लागण्याचे निर्देश!

खासदार राजेंद्र जैन यांनी मांडलेल्या प्रत्येक विषयाची गंभीर दखल घेत पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कृती आराखडा तयार करून कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत. खासदार जैन यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गोंदिया शहरातील प्रलंबित विकासकामांना आता मोठी गती मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.