25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ जातीनिहाय जनगणना न झाल्याने ओबीसींचे दरवर्षी ९५ हजार कोटींचे नुकसान; विदर्भातील ११...

जातीनिहाय जनगणना न झाल्याने ओबीसींचे दरवर्षी ९५ हजार कोटींचे नुकसान; विदर्भातील ११ जिल्ह्यात मंडल जनगणना यात्रा

0
7

नागपूर:“जातीनिहाय जनगणना न झाल्यामुळे आणि योग्य घटनात्मक हक्क व निधी न मिळाल्याने ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समुदायाचे दरवर्षी तब्बल ९५,००० कोटींचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक नुकसान होत आहे. सरकारने या अन्यायाची तातडीने दखल घेऊन स्वतंत्र जातीनिहाय जनगणना सुरू केली नाही, तर संपूर्ण देशभर सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा रोखठोक इशारा ‘सकल ओबीसी महामोर्चा’चे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी दिला आहे.

गेल्या ५ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याचा पुढचा टप्पा म्हणून, ‘सकल ओबीसी महामोर्चा’ आणि विदर्भातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ०३ ऑगस्ट २०२६ ते रविवार, ०९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांत भव्य ‘५ वी मंडल जनगणना यात्रा’ धडकणार आहे.

असा असेल ‘मंडल जनगणना यात्रेचा’ मार्ग:

  • प्रारंभ: सोमवार, ०३ ऑगस्ट २०२६ | सकाळी १०:०० वाजता | त्रिमूर्ती चौक, भंडारा

  • समारोप: रविवार, ०९ ऑगस्ट २०२६ | दुपारी ०३:०० वाजता | प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर

  • प्रवासाचा टप्पा: भंडारा ➔ नागपूर ➔ वर्धा ➔ यवतमाळ ➔ वाशीम ➔ बुलढाणा ➔ अकोला ➔ अमरावती ➔ नागपूर ग्रामीण ➔ गोंदिया ➔ गडचिरोली ➔ चंद्रपूर.

नागपूर शहरात १५ ठिकाणी होणार जंगी स्वागत!

मौदा मार्गे ही यात्रा नागपूर शहरात प्रवेश करणार असून शहरातील प्रमुख मार्गांवरून जात १५ ठिकाणी यात्रेचे अभूतपूर्व स्वागत केले जाईल:

१. यशोदा फरसाण चौक (पारडी) | २. सुनील हॉटेल चौक (सुभाष पुतळा) | ३. गांधी पुतळा (टाओरी चौक) | ४. गांधी गेट (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा) | ५. झेंडा चौक | ६. संत जगनाडे चौक | ७. एरंडेल तेली समाज (एस. डी. हॉस्पिटल चौक) | ८. तिरंगा चौक (संजय समोसा जवळ) | ९. केशव द्वार (रेशीमबाग) | १०. प्रिया बार चौक (रेशीमबाग) | ११. मेडिकल चौक | १२. कॉटन मार्केट चौक (महात्मा फुले पुतळा) | १३. गांधी पुतळा (वैरायटी चौक) | १४. संविधान चौक | १५. छत्रपती चौक (वर्धा रोड).

केंद्र व राज्य सरकारकडे महामोर्चाच्या मुख्य मागण्या:
  • स्वतंत्र जातीनिहाय जनगणना: केंद्र सरकारने एससी/एसटीप्रमाणे ओबीसी समुदायासाठी जनगणनेत स्वतंत्र कॉलम देऊन तातडीने जातीनिहाय जनगणना करावी.

  • केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र मंत्रालय: ओबीसी समाजासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे.

  • ‘महाज्योती’स १,००० कोटींचा निधी: ‘महाज्योती’ (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) या संस्थेला तात्काळ ₹१,००० कोटींचा निधी मंजूर करावा.

  • १ लाख पदांची बॅकलॉग भरती: सरकारी सेवेतील ओबीसी कर्मचाऱ्यांचा १ लाख पदांचा बॅकलॉग तातडीने भरण्यात यावा.

  • १००% शिष्यवृत्ती व ७२० वसतिगृहे: व्यावसायिक व बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांतील ओबीसी विद्यार्थ्यांना १००% शिष्यवृत्ती द्यावी आणि प्रत्येक तालुक्यात ७२० स्वतंत्र वसतिगृहे सुरू करावीत.

  • इतर महत्त्वाच्या मागण्या: ‘महात्मा फुले ओबीसी भवन’, घरकुल योजनेची मदत ₹५ लाख करणे, ‘इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला’ ₹१,००० कोटींचा निधी देणे, ५०० विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देणे आणि शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करून हमीभाव देणे.

पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांचा एल्गार!

पत्रकार परिषदेला कृतल आकरे, डॉ. रमेश पिसे, अशोक काकडे, राजेश काकडे, आकाश वैद्य, मुकुंद अडेवार, विनीत गजभिये आणि विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जनजागरण यात्रेत विदर्भातील सर्व ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी बांधवांनी, विद्यार्थ्यांनी, महिलांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आक्रमक आवाहन ‘सकल ओबीसी महामोर्चा’च्या वतीने करण्यात आले आहे.