
सडक अर्जुनी, दि. २९ : कोहमारा ते नवेगावबांध राज्य महामार्गवर कनेरी नाल्याजवळ बुधवारी दुपारी सुमारे १२.१५ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडून आई व चिमुकल्याचा जागीच मृत्यू ,तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पिताबंर प्रकाश लांजेवार(वय ३५), शुभांगी पितांबर लांजेवार (वय ३०) व रियांश पितांबर लांजेवार (वय ३) रा. कोदामेडी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया हे मोटरसायकल क्रमांक एमएच ३५ एएम ७३४८ वरून नवेगावबांधकडून कोहमाराकडे जात होते.यावेळी समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत मोटरसायकलला जोरदार धडक दिली.या अपघातात शुभांगी लांजेवार व रियांश लांजेवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर पितांबर प्रकाश लांजेवार (वय ३५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच डोंगरगाव पोलीस केंद्राचे सपोनि राजू बस्तवाडे, पोउपनि मट्टामी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र नंतर सुरळीत करण्यात आली.या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.





