26 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके’ सन्मानाने वाशिमचा मान उंचावला;चार आरोग्य संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते...

राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके’ सन्मानाने वाशिमचा मान उंचावला;चार आरोग्य संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

0
17
वाशिम, दि. १ मे -जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने गुणवत्ता सिद्ध करत राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला असून, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके  प्रमाणपत्राने गौरविण्यात आलेल्या चार आरोग्य संस्थांचा महाराष्ट्र दिनी दिमाखदार सन्मान करण्यात आला.

राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात हा गौरव सोहळा पार पडला.यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी.एस.ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय स्तरावरील कठोर मूल्यमापन प्रक्रियेत यश मिळवलेल्या ग्रामीण रुग्णालय, मालेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडशी (ता. मालेगाव), आरोग्य उपकेंद्र, कवठळ (ता. मंगरूळपीर) आणि आरोग्य उपकेंद्र, लोणी (अरब) (ता. कारंजा) या संस्थांच्या प्रमुखांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता निर्माण करून नागरिकांचा विश्वास संपादन करणे ही महत्त्वाची बाब आहे. या संस्थांनी उभारलेला आदर्श लक्षात घेऊन जिल्ह्यातील अधिकाधिक आरोग्य संस्थांनी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (NQAS) प्रमाणन मिळवावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तसेच ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा उल्लेख करत ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. १४ वर्षांच्या मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत पालकांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.समारंभामुळे आरोग्य विभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गुणवत्तापूर्ण सेवेकडे वाटचाल अधिक वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

blank