वाशिम, दि. १ मे – मानवतेचा उज्ज्वल संदेश देणाऱ्या मरणोत्तर नेत्रदानाच्या कार्याला महाराष्ट्र दिनी वाशिममध्ये सलाम करण्यात आला. नेत्रदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या सामाजिक योगदानाची कदर करण्यात आली. राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, डॉ. अनिल कावरखे, डॉ. अविनाश पुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, डॉ. आशिष बेदरकर यांची उपस्थिती होती.यावेळी विकास निवृत्ती वानखेडे, प्रताप अर्जुन धबाले, गजानन कडूजी ठाकरे, संतोष पुरुषोत्तम वाघमारे, मालती राजेंद्र दाभाडे, रवींद्र माधवराव पाटील, कुंडलिक परसराम चोपडे यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.नेत्रदान ही दुसऱ्याला नवे आयुष्य देण्याची संधी असल्याचे सांगत पालकमंत्री भरणे यांनी नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन केले. समाजात या उपक्रमाबाबत जागरूकता वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.





