• खरीप हंगाम आढावा सभा
गोंदिया, दि.6 : यावर्षीच्या अंदाजीत पर्जन्यमानानुसार पावसाचे पाणी कमी येणार असल्याचे वर्तविल्या जात असल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी खरीप हंगाम पूर्वी आढावा बैठक सभेत दिले.
खरीप पूर्व आढावा सभेत श्री नाईक बोलत होते. पालकमंत्री श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडली. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर,, खासदार नामदेव किरसान, सर्वश्री आमदार विनोद अग्रवाल, संजय पुराम, जि.प. उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे, जि .प. कृषी समितीच्या सभापती श्रीमती चंद्रिकापुरे, जि.प. अर्थ व बांधकाम सभापती लक्ष्मण भगत सभापती जिल्हाधिकारी डॉ मंगेश गोंदवले,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुग्णांथम, अति. मु. का. अ. जिल्हा परिषद तानाजी लोखंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे , आत्माचे प्रकल्प संचालक अजित अडसूळे तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
खरीप हंगामात जिल्ह्यात भात, तुर, तीळ, मका, हरभरा, जवस, मोहरी आणि भाजीपाला ही पिके घेतली जात असून वर्ष 26- 27 मध्ये 20,3209 हेक्टर जमिनीवर खरीपाची पेरणी प्रस्तावित असल्याने यासाठी योग्य पाण्याचे नियोजन करण्याबाबत सांगितले.
श्री. नाईक यांनी नुकतेच आलेल्या अवकाळी पावसाने शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे यावेळी निर्देश दिले. खरीप हंगामात घेणाऱ्या पिकांसाठी 56 हजार 946 क्विंटल बियाण्याची गरज प्रस्तावित असून याबाबत शेतकऱ्यांना कुठल्याही अडचण येणार नाही आणि निर्धारित दरावर त्यांना बियाणे मिळतील याची तपासणी योग्य प्रमाणे करावी असे सांगून खतांचा काळाबाजार आढळल्यास दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना श्री नाईक यांनी यावेळी केल्या. युरिया डी ए पी सारख्या खतांबरोबर दुसरे खत व औषधी घेण्यास भाग पाडले असल्यास स्पष्ट नकार देऊन शेतकऱ्यांनी शासनाकडे तक्रार करावी, असे आवाहनही नाईक यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचे धानाचे पैसे प्रलंबित असल्याने ते पैसे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे असेही श्री नाईक यावेळी म्हणाले. जिल्ह्यात 1 मे पासून मका खरेदी केंद्र सुरू झाल्याचे जाहीर झाले असूनही काही मका केंद्रात अद्याप खरेदी केली जात नसल्याचे आढळून आल्याने तातडीने मका केंद्रात मका खरेदी करण्याची कारवाई करण्यात यावी, असेही श्री नाईक यावेळी म्हणाले.
नॅनो युरिया शेतकऱ्यांना परवडणारा आणि जमिनीची उत्पादकता वाढविणारा असून शेतकऱ्यांना खरेदी करण्या संदर्भात कृषी विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी असे, श्री नाईक बैठकीत म्हणाले. प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांनी काढावा जेणेकरून त्यांना अडचणीच्या वेळी दिलासा मिळतो. वर्ष 2025 मध्ये भात पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून 56 हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 50 हजार शेतकऱ्यांना पिक विमा योजनेअंतर्गत 38.41कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला. ही मदत शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी उपयोगी ठरते. त्यामुळे पीक विमा काढावा असे श्री नाईक यांनी सांगून विभागांनी शेतकऱ्यांना याबाबत जागरूकता करावी, असे नाईक यांनी सांगितले.
राज्य शासनाने महा विस्तार ॲप तयार केला असून जिल्ह्यातील एकूण ७१,८०४ शेतकऱ्यांनी हा ॲप डाऊनलोड केलेला आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना हंगामा पूर्व तयारी व नियोजन, बियाणे आणि पेरणी तंत्रज्ञान, मृदा आरोग्य आणि खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, विस्तार व डिजिटल प्रशासन याबद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे या ॲपचा वापर करण्याबाबत ही जागरूकता पसरवण्याचे सांगितले.
वर्ष 2026-27 साठी विविध योजनेअंतर्गत एकूण 26,274 लाभार्थी निवड
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत भात पिकासाठी 8000 , कडधान्यासाठी 6000, भात पड क्षेत्र कडधान्यसाठी 4000, पौष्टिक तृणधान्य 500, भरडधान्य 2000, लाभार्थी नियोजित आहेत, कोरडवाहू क्षेत्रासाठी 180, केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकी उपअभियान करिता 500, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण यासाठी 2000, पीएमकेएसवाय ठिबक सिंचन योजनेसाठी 100, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना वैयक्तिक शेततळे 50, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 264, राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक यासाठी 200, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 1340, रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड 1340 लाभार्थी नियोजित आहेत अशी माहिती जिल्हा कृषी अध्यक्ष श्री कानवडे यांनी पालकमंत्री यांना दिली.
मका पीक वाढवण्यासाठी विशेष प्रकल्प राबविला जात असेल राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मका उत्पादन वाढविण्यासाठी 3 वर्षाचा 25- 28 प्रकल्प राबविला जात आहे. भात शेतीला पर्याय म्हणून मका पिकाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा पुरवठा करणे हा यामागचा उद्देश असून यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत 42 000, शेतकऱ्यांना कुटुंबांना थेट लाभ होणार आहे. तीन वर्षात 16,800 हेक्टर शेत क्षेत्र नवीन लागवडीखाली आणण्याचे उद्दिष्ट याची माहिती श्री कानवडे यांनी यावेळी दिली.आत्मा या प्रकल्पा मार्फत महाराष्ट्र नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेती शाळा नियोजन करण्यात आले असून आठ तालुक्यात 50 नियोजित असल्याची माहिती प्रकल्प संचालक अडसुळे यांनी दिली.





