23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ थकीत वेतनाकरीता भीषण उन्हात मजीप्राच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

थकीत वेतनाकरीता भीषण उन्हात मजीप्राच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

0
449

गोंदिया,दि.०६- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी मागील दोन महिन्यापासून सेवानिवृत्ती वेतनापासून वंचित असल्याने भीषण उन्हाळ्यात वयोवृद्ध ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना हक्काच्या पेन्शन करिता संघर्षाची वेळ आलेली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लेखाशीर्ष महालेखाकार कार्यालयाने गोठविल्यामुळे मार्च महिन्यापासून सेवानिवृत्ती वेतनापासून अधिकारी कर्मचारी वंचित झाले आहेत.याविरोधात आज ६ मे रोजी राज्यभरातील महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी शासनाचे लक्ष वेधण्याकरीता भीषण उन्हात आंदोलन केले.आंदोलनकर्ते सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावे असलेले निवेदन उपजिल्हाधिकारी मानसी पाटील व मजिप्राचे कार्यकारी अभियंता यांच्या माध्यमातून पाठविले आहे. blank
2017 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने व मजीप्रा हा विभाग पूर्वीचा शासनाचा असल्याने मजीप्राच्या कर्मचाऱ्यांना सर्व नियम सेवा शर्ती या शासनाच्याच लागू असल्याने तत्कालीन शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन दिनांक 23 मार्च 2017 रोजी शासन निर्णय निर्गमित करून मजीप्राच्या सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांची वेतन व सेवानिवृत्ती वेतानाची जबाबदारी स्वीकारून मजीप्रा कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्यात येत आहे, असे त्या निर्णयात नमूद केले होते. परंतु सदरची कार्यवाही ९ वर्षांपासून प्रलंबित असल्याने (अकाउंटंट जनरल )महालेखाकार कार्यालयाने मजीप्रा कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणारा वेतन कोड हा तात्पुरता असल्याने व त्याची मुदत 31 मार्च 2026 रोजी संपल्याने पुढील सेवानिवृत्ती वेतन देणे शक्य होणार नाही, असे पत्राद्वारे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला कळविले.त्यामुळे माहे मार्च पासून मजिप्रा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन बंद करण्यात आले आहे.
त्यामुळे मजीप्रातील वयोवृद्ध ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी हे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले आहे. आज अनेक सेवानिवृत्त कर्मचारी हे निव्वळ पेन्शनवर अवलंबून असून वेळेवर औषधोपचार त्यांना न मिळाल्यामुळे अनेक वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचारी हे हवालदिल झाले असून त्यांची प्रकृती अधिक बिघडलेली आहे.या बाबत सेवानिवृत्ती वेतन न मिळाल्याचे निवेदन शासनाच्यासर्वच संबंधित विभागांना मजिप्रा कर्मचारी संघर्ष कृती समितीने दिलेले असून तरीही सेवानिवृत्ती वेतन न मिळाल्याने आज दि.६ मे रोजी राज्यभर हक्काच्या सेवानिवृत्ती वेतनाकरिता आंदोलन करीत तातडीने सेवानिवृत्ती वेतन देण्याची मागणी केली आहे.गोंदियातील आंदोलनात  संजयकुमार एच. कटरे,राजु खैरे,दिनेश तुरकर,ओ.बी.सोयाम्,एस आर भोयर,नासीर मुस्तजा सोयाड,जी.यु.धारकर,जे.डी.लिल्हारे,एन.सी.परमार,एस.बी.पटले, आर.सी.चित्रीव,एन.जी.अरखेल,डि.आर.सहारे,श्रीमती.आर.एच.ठेंगरे,एन.सी.फेंडारकर,जी.एस.बोरकर,एन.डी.सोनवाने,एम.आर.बिजेवार,एफ.पी.फरदे,बी.एस.रहागंडाले,एच.सी.नैकाने,एस.एन.त्रिवेदी,सी.एस.हरिणखेडे,जी.एस.कावडे,धनसिग सुर्यवंशी,डी.पी.खापेकर,ईश्वर के.चांदवानी आदी गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

blank