भंडारा : जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेत प्रशासनाकडून केला जाणारा भेदभाव आणि खतांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ यावरून माजी आमदार चरण वाघमारे यांनी सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर कडक शब्दांत टीका केली आहे.शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी आता शेतकऱ्यांनीच संघटित होऊन जागे होण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
धान खरेदीतील ‘राजकारण’ आणि प्रशासकीय भेदभाव…
जिल्ह्यात २५८ खरेदी केंद्र असताना केवळ सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या निकटवर्तीयांच्या केंद्रांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोप माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे. त्यांनी मांडलेली आकडेवारी:
मोहाडी तालुका: २५ पैकी केवळ ८ केंद्रांना १.९२ लाख क्विंटलची मोठी मर्यादा (लिमिट) देण्यात आली, तर उर्वरित १७ केंद्रांकडे दुर्लक्ष केले.
तुमसर तालुका: ३६ पैकी फक्त ३ केंद्रांना ८१ हजार क्विंटलची मर्यादा देऊन ‘मेहेरबानी’ करण्यात आली.
सद्यस्थिती: सुमारे २० लाख क्विंटल धान केंद्रांवर पडून असताना लोकप्रतिनिधी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी मग्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
खतांच्या किमतीत मोठी वाढ (आर्थिक फटका)
धान खरेदीच्या गोंधळातच सरकारने खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांवर ‘आर्थिक सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचे चरण वाघमारे म्हणाले.
ओबीसी जनगणनेबाबत महत्त्वाचे आवाहन…
यावेळी चरण वाघमारे यांनी ओबीसी समाजाला आपल्या हक्कासाठी सावध राहण्याचे आवाहन केले. “जनगणना कर्मचारी माहिती घेण्यासाठी आल्यास, ओबीसी समाजासाठी SC, ST प्रमाणे स्वतंत्र रकाना उपलब्ध आहे का, याची खात्री करा. जर स्वतंत्र नोंद नसेल, तर त्याविरोधात ठाम भूमिका घ्या,” असे त्यांनी स्पष्ट केले.
”लोकप्रतिनिधींना तुमच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आणि अन्यायाविरुद्ध मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आता शेतकऱ्यांनी गाफील न राहता आपल्या हक्कासाठी लढा द्यावा.”
— चरण वाघमारे, माजी आमदार, तुमसर विधानसभा मतदारसंघ.





