30.7 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home गुन्हेवार्ता गर्भवतीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न

गर्भवतीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न

0
120

गोंदिया : नऊ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेला पतीसह सासरच्या चौघांनी अमानुष मारहाण करून गळा दाबत खून करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना आमगाव तालुक्यातील ग्राम मोहगाव येथे घडली. या प्रकरणी आमगाव पोलिसांनी पती, दीर, सासू व सासऱ्याविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी मेघना अमोल शेंडे (२०, रा. मोहगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा प्रेमविवाह ६ एप्रिल २०२५ रोजी झाला असून, त्या सध्या नऊ महिन्यांची गर्भवती आहेत. पती अमोल शेंडे याला दारू पिण्याचे व्यसन असून, तो वारंवार किरकोळ कारणांवरून मारहाण करतो. २६ एप्रिल २०२६ रोजी मेघना पती अमोलसोबत येथील बाई गंगाबाई रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. यानंतर सायंकाळी आरोपी अमोल शेंडे, दीर कमल शेंडे, सासरे भरत शेंडे व सासू गीता शेंडे यांनी एकत्र येऊन पुन्हा मारहाण केली. तिला खाली पाडून सासू-सासऱ्यांनी हातपाय पकडून ठेवले, तर पती व दिराने गळा दाबत पोटावर लाथा मारल्या. या मारहाणीत मेघनाच्या गळ्याला जखमा झाल्या तसेच रक्तस्राव सुरू झाला.
दरम्यान, तिच्या आरडाओरडीने परिसरातील नागरिक जमा झाल्यामुळे आरोपी तेथून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत स्थानिक उपचारानंतर तिला येथील बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ६ मेपर्यंत तिच्यावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी गर्भातील बाळाची प्रकृती सुरक्षित असल्याचे सांगितल्यानंतर डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी आई-वडिलांसह आमगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३ (५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

blank