‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत 82 हजारांचा मुद्देमाल जप्त; 19 ग्राहकांवर कारवाई
नागपूर : नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत मानवनगर परिसरातील ‘नेटफ्लिक्स अँड चिल कॅफे’वर मध्यरात्री धाड टाकून अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी 82 हजार 995 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 19 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री रंगला पंजाब रेस्टॉरंटजवळील कॅफेवर छापा टाकला. यावेळी सोहेल खान फिरोज खान (22) याच्यासह कर्मचारी आणि ग्राहक हुक्क्याचे सेवन करताना आढळून आले. ग्राहकांना मानवी आरोग्यास धोकादायक ठरणारे तंबाखूजन्य पदार्थ पुरवले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान हुक्का पॉट, विविध फ्लेवर्स, फ्रीझर, फर्निचर आणि अन्य साहित्य असा एकूण 82 हजार 995 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 272 तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
रविंद्रकुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थ आणि अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. मे 2025 ते मे 2026 या कालावधीत शहरातील 110 हून अधिक हुक्का पार्लर आणि अमली पदार्थ संबंधित ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.या कारवायांमध्ये 250 हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली असून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 1,200 हून अधिक तरुण-तरुणींवर सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे 15 कॅफेंचे व्यावसायिक परवाने रद्द करण्याची शिफारस महानगरपालिकेकडे करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.





