40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात; उलटलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सची धडक, एक ठार

कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात; उलटलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सची धडक, एक ठार

0
473

blank

गोंदिया: गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील जानाटोला परिसरात मंगळवारी पहाटे भीषण अपघात घडून एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर १० ते १२ प्रवासी जखमी झाले. रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव ट्रॅव्हल्सने त्या ट्रकला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. पहाटेच्या अंधुक प्रकाशात आणि निष्काळजीपणाच्या छायेत घडलेल्या या दुर्घटनेने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.फुलेल खिरवार (वय ३०, रा. जिल्हा खैरागड, छत्तीसगड) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर गोंदिया येथील शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास कोहमारा मार्गाने जाणाऱ्या मालवाहू ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गोरेगाव शहराजवळील जानाटोला परिसरातील पेट्रोल पंपासमोर ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटला. त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांकडून तातडीने कोणतीही बॅरिकेडिंग किंवा इशारा फलक लावण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, खासगी ट्रॅव्हल्स त्याच वेळी, त्याच मार्गाने जात होती. पहाटेचे अंधुक वातावरण, समोर अचानक दिसलेला उलटलेला ट्रक आणि कोणताही इशारा नसल्याने चालकाला वाहन नियंत्रणात आणण्यास वेळ मिळाला नाही. ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक बसली आणि त्यानंतर वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटले. अपघाताचा आवाज इतका भीषण होता की परिसरात क्षणभर भीतीचे सावट पसरले.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या सहाय्याने उपचारासाठी गोंदियाकडे रवाना करण्यात आले. काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षा उपाययोजनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. अपघातानंतर काही मिनिटांत योग्य व्यवस्था उभारली असती, तर कदाचित हा दुसरा जीवघेणा अपघात टळला असता, अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांमधून व्यक्त होत आहे. गोरेगाव पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.

blank