– प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा येथे एकदिवसीय कार्यशाळा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
गोरेगाव – गाव रोगमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांच्यासह लोकांचा सहभाग मिळविणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन, जनआरोग्य समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे यांनी केले.
तालुक्यातील कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दिनांक १४ मे रोजी माझे “गाव आरोग्य संपन्न गाव” अभियान संदर्भात कार्यशाळा व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती चित्रकला चौधरी, माजी उपसभापती राजकुमार यादव, कवलेवाडा सरपंच दमयंता कटरे, चिचगाव सरपंच भूमेश्वरी रहांगडाले, भागचंद्र रहांगडाले, स्नेहा कोल्हे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा भावे उपस्थित होते. यावेळी माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानासंदर्भात आरोग्य सेवक जगणे यांनी माहिती दिली. याप्रसंगी सभापती चित्रकला चौधरी यांनी मार्गदर्शन करताना अभियान राबविताना सर्वांचे सहकार्य कसे घेता येईल, याबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आपले प्राथमिक आरोग्य केंद्र व आपल्या तालुक्याचा नावलौकिक करण्याची सुवर्णसंधी असून यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. यावेळी भागचंद्र यांनी मार्गदर्शन करताना ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांचे योग्य समन्वय झाल्याशिवाय अभियान यशस्वी होणार नसल्याने दोन्ही विभागाने समन्वय साधत गाव आरोग्य संपन्न करण्याचे आवाहन केले. यावेळी आयोजित आरोग्य शिबिरात ग्रामस्थाची बीपी, शुगर, एचबी तसेच रक्त तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन आरोग्य सहायक जगणे यांनी तर आभार लिपिक रहांगडाले यांनी केले. यावेळी सीएचओ आचल हरिणखेडे, आरोग्य सहायक वैद्य, नितीन रामटेके, फार्मसिस्ट साळवे यांच्यासह इतर कर्मचारी, आशा सेविका उपस्थित होते.





