*गोंदियात ‘समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद;*
*17 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ*
गोंदिया, दि.1 : शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचवणे हेच लोककल्याणकारी राज्याचे ध्येय असून प्रशासनाने थेट जनतेच्या दारी जाऊन दिलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांनी केले.
*एकाच छताखाली सेवा देणे हीच खरी लोकसेवा : आमदार विनोद अग्रवाल*
सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देत सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे हीच खरी लोकसेवा असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून 1 ऑगस्ट रोजी जलाराम लॉन, गोंदिया येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत भव्य ‘समाधान शिबिर’ उत्साहात पार पडले. या शिबिराला तालुक्यातील नागरिक, शेतकरी व लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
२२ ते ३० जुलै २०२६ दरम्यान राबवलेल्या ‘कर्तव्य साधना सप्ताहा’त १२,९१३ व १ ऑगस्टच्या मुख्य शिबिरात ४,२४० अशा एकूण १७,१५३ लाभार्थ्यांना या मोहिमेतून थेट लाभ देण्यात आला. यामध्ये महसूल विभागातर्फे १,१८० शासकीय दाखले, १,२८० नवीन प्राधान्य कुटुंब राशन कार्ड, ७४८ खातेदारांच्या नाव दुरुस्तीसह ३६८ प्रकरणात वारस फेरफार नोंदी करण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागातील २४५ व शहरी भागातील २५० निवासी अतिक्रमणधारकांना हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले.
आरोग्य व कृषी सेवांतर्गत ९,१४५ आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आले, तर ‘पीएम किसान’ योजनेतील २९० शेतकऱ्यांचा बंद झालेला लाभ पुन्हा सुरू करण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ प्रकल्पांतर्गत २१ महिला बचत गटांना १.१७ कोटी रुपयांचे कर्जवाटप, २४७ बेबी केअर किट व ७४ महिलांना मातृ वंदन योजनेचा लाभ देण्यात आला.
याप्रसंगी आमदार डॉ. परिणय फुके, अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे, न.प. मुख्याधिकारी संदीप बोरकर, पं.स. सभापती मुनेश रहांगडाले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शिबिरस्थळी २४ विभागांचे विशेष कक्ष, ८ नागरी सुविधा केंद्रे व २ आधार केंद्रांची सोय करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार समशेर पठाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी, लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





