‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेसाठी तालुका स्तरीय समन्वय समितीची सभा संपन्न
गोंदिया,दि.१५:‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर या समितीच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधून ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यावर भर देत ग्रामीण भागातील गावांना आरोग्य संपन्न बनविण्याकरीता सर्वांनी नियोजनबध्द काम करावे अशा सुचना समितीचे अध्यक्ष व गोंदिया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी दिल्या. ते महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य उंचावण्यासाठी “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या विशेष मोहीमेच्या गोंदिया तालुकास्तरीय समितीच्या समन्वय समिती सभेत १४ मे रोजी बोलत होते.
सभेत जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय समित्या तयार करुन अभियानाच्या अमंलबजावणीकरीता संबधित क्षेत्रातंर्गत येत असलेल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक,सेवानिवृत्त अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,स्वयंसेवी संस्था प्रतिनिधीसोबत समन्वय कसे करता येईल यावर गटविकास अधिकारी देवरे यांनी मार्गदर्शन केले.सभेला तालुका आरोग्य अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. निलेश जाधव,डॉ विलास येडे, डॉ पायल रहांगडाले, डॉ शुभम गौत्तम, डॉ मौजे, डॉ अंकुश मेश्राम, डॉ कल्याणी गोतमारे प्रा आ केंद्र भानपुर, दवानिवाडा, एकोडी, दासगाव, काटी, रावणवाडी, मोरवाही, खामरी, कामठा येथील वैद्यकीय अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प 1 व 2, विस्तार अधिकारी पंचायत,पत्रकार प्रतिनिधी खेमेंद्र कटरे, आरोग्य, दृष्टी सामाजिक संस्था प्रतिनिधी,पंचायत समिती गोंदिया कार्यालयातील सबंधित कर्मचारी सर्व कर्मचारी उपस्थित होते.
गावागावात आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊन गावे खऱ्या अर्थाने ‘आरोग्य संपन्न’ करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.सभेत मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करायच्या सूक्ष्म नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.सोबतच तालुक्यातील मोठ्या आणि शासकीय योजनांच्या स्पर्धेत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तालुकास्तरीय समितीच्या बैठका आयोजित करुन त्या गावातील सहभाग वाढविण्याकरीता प्रोत्साहित करण्याच्या हेतून नियोजन करण्याच्या सुचना यावेळी गटविकास अधिकारी देवरे यांनी दिले.तालुका वैद्यकीय अधिकारी व समितीचे सदस्य सचिव डॉ. निलेश जाधव यांनी नागरिकांचे आरोग्य सुधारणे व आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून बालमृत्यू दर, माता मृत्यू दर, कुपोषण, कृष्ठरोगाचे दुरीकरण करणे, क्षयरोगाचे दुरीकरण करणे करीता “”माझं गाव आरोग्य संम्पन्न गाव””,मोहीम एप्रिल 2026 पासून वर्षभर राबविण्यात येणार आहे .तसेच मोहिमेची तांत्रिक बाजू,शासन निर्णयाची माहिती देत तालुक्यातील ११० ग्रामपंचायती या मोहिमेत सहभागी झाल्याचे सांगितले.तसेच १ एप्रिल रोजी ११० ग्रामपंचायतीनी विशेष ग्रामसभा आयोजित करुन नागरिकांपर्यंत माहिती पोचवल्याचेही सांगितले.





