31 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home Top News हिंगणी तलावात मासेमारीची होडी पलटून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

हिंगणी तलावात मासेमारीची होडी पलटून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

0
126

बीड : धारूर तालुक्यातील हिंगणी येथे शनिवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या परिवारातील पाच मुली तलावावर पोहण्यासाठी गेल्या होत्या, मात्र मासेमारीच्या होडीवर बसने त्यांच्या जिवावर बेतले.
मासे पकडण्याची होडी पलटल्याने दोन मुलींचा पाण्यात बुडून करून अंत झाला. पलक शामराव पारवे (वय १४, रा. हटिंगणी) आणि दिव्या विकास कांबळे (रा. कासारवाडी, ता. परळी) अशी मृत मुलींची नावे आहेत.

शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हिंगणी येथील पारवे कुटुंबातील पलक पारवे, दिव्या कांबळे, मोहिनी पारवे, तन्वी पारवे आणि जानवी पारवे या पाच मुली तलावावर गेल्या होत्या. तिथे मासे पकडण्यासाठी असलेल्या होडीवर पलक, दिव्या आणि मोहिनी या तिघी जणी बसल्या. मात्र, होडी तलावाच्या मधोमध गेल्यानंतर अचानक अनियंत्रित होऊन पलटली.

होडी पलटल्याने तिघीही पाण्यात बुडू लागल्या. मोहिनीला पोहता येत होते, मात्र पाण्यात बुडत असलेल्या पलक आणि दिव्या यांनी घाबरून मोहिनीला घट्ट पकडल्याने तीही बुडू लागली. तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या इतर मुलींनी हा प्रकार पाहून आरडाओरडा सुरू केला.मुलींचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली आणि तिघींनाही बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढले. यातील मोहिनीला तातडीने शुद्ध आली, मात्र पलक आणि दिव्या यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वराती (स्वामी रामानंद तीर्थ) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे हिंगणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.