30.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home गुन्हेवार्ता राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणारा आंतरराज्यीय आरोपी २४ तासांत जेरबंद

राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणारा आंतरराज्यीय आरोपी २४ तासांत जेरबंद

0
69

गोंदिया : राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीला अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांना यश आले आहे. आरोपीकडून रोख रक्कम, आयफोन व दुचाकीसह एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी फिर्यादी नेकराम लोकचंद शहारे (वय ५७, रा. खडकी/बाम्हणी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) यांनी पोलीस स्टेशन देवरी येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, दि. १२ मे २०२६ रोजी रात्री देवरी आठवडी बाजार करून ते दुचाकीने आपल्या गावी परत जात असताना राष्ट्रीय महामार्गावर एका अनोळखी इसमाने त्यांची मोटारसायकल अडवली. आरोपीने त्यांच्याकडील ३ हजार रुपये रोख व मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर गुगल पे अॅपचा पासवर्ड धमकावून जाणून घेत विविध पेट्रोल पंपांवर जाऊन ऑनलाइन व्यवहार करून ४९ हजार ८०० रुपये काढले. अशा प्रकारे आरोपीने एकूण ५२ हजार ८०० रुपयांची जबरी चोरी केली.

या तक्रारीवरून पोलीस स्टेशन देवरी येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६) व १२६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाणे हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी अयान अब्दुल करिम खान (वय १९, रा. शास्त्री मार्केट, नया मटन मार्केट परिसर, लोहारपारा बांसटाल, रायपूर, छत्तीसगड) याला ताब्यात घेतले.चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने देवरी-कोहमारा मार्गावरील पुलाजवळ फिर्यादीची दुचाकी अडवून जबरी चोरी केल्याचे सांगितले.

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात खालील वस्तूंचा समावेश आहे : रॉयल इनफिल्ड हंटरबर्ड दुचाकी – किंमत २ लाख रुपये,  रोख रक्कम – ३० हजार रुपये, अॅपल कंपनीचा आयफोन – किंमत ४५ हजार रुपये, असा एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर आरोपीला पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन देवरी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वनीता सायकर, पोलीस हवालदार दिक्षीतकुमार दमाहे, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, पोलीस शिपाई राकेश इंदुरकर तसेच चालक पोलीस शिपाई घनश्याम कुंभलवार यांनी केली.