गोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाविरोधात कथित आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणाने गोंदिया जिल्ह्यात सामाजिक व कायदेशीर स्तरावर मोठी चर्चा निर्माण केली असून, या प्रकरणात गंभीर स्वरूपाची कलमे लागू करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत रोशन खुशाल बडोले यांनी जिल्हा सत्र न्यायालय, गोंदिया येथे स्वतंत्र अर्ज सादर केला आहे.
सदर प्रकरणात आरोपी गौरेश यशवंत बावनकर यांच्याविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तपासादरम्यान माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act 2023) अंतर्गत कलम ६६-अ तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम १९६, ३१८ आणि ३१८(बी) यांसारखी गंभीर कलमे पोलिसांनी लागू केली नसल्याचा मुद्दा अर्जदाराने न्यायालयासमोर उपस्थित केला आहे.
रोशन बडोले यांनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात नमूद केले आहे की, आरोपीने सोशल मीडियावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानासंदर्भात कथित आक्षेपार्ह, जातीवाचक आणि समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर पोस्ट केला. संबंधित पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून काही व्यक्तींनी ती पोस्ट फॉरवर्ड, लाईक आणि शेअर करत त्यावर हास्यास्पद इमोजी देखील वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अर्जात पुढे म्हटले आहे की, या प्रकारामुळे विशेषतः महार समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून समाजामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित सर्व व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, आरोपीसोबत कटकारस्थान रचणाऱ्या इतर संबंधित व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे. समाजामध्ये द्वेषभावना निर्माण करणाऱ्या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात आरोपी गौरेश बावनकर यांनी दाखल केलेल्या फौजदारी जामीन अर्ज क्रमांक १५५/२०२६ वर जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, गोंदिया यांच्या न्यायालयात दि. १५ मे २०२६ रोजी सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान अर्जदाराच्या वकिलांनी बाजू मांडली, तर सरकारी वकिल तसेच फिर्यादीकडूनही स्वतंत्र अर्ज सादर करण्यात आले.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





